RBI १ एप्रिल २०२७ पासून १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी सुरू करण्याच्या तयारीत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
१० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांचा प्रायोगिक प्रकल्प १ एप्रिल २०२७ पासून सुरू करण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेची तयारी असल्याचे समोर येत आहे. नोटांचा आकार तोच राहणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२७ पासून १० रुपये आणि २० रुपयांच्या नवीन पॉलिमर नोटांचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. म्हणजेच कागदी नोटांच्या जोडीला आता प्लास्टिकच्या नोटाही हातात येण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पात १० रुपयांच्या १०० कोटी (१ अब्ज) पॉलिमर नोटा आणि २० रुपयांच्या १०० कोटी (१ अब्ज) पॉलिमर नोटा चाचणीसाठी बाजारात जारी केल्या जातील. ही केवळ क्षेत्रीय चाचणी असल्याने नवीन प्लास्टिक नोटा सध्याच्या कागदी नोटांसोबतच चलनात राहतील. जुन्या कागदी नोटा पूर्णपणे वैध राहणार आहेत.
नोटांच्या आकारात काहीही बदल होणार नसल्याचेही समोर येत आहे. त्याचा फायदा बँकांना होईल, कारण एटीएममध्ये बदल करण्यासाठी त्यांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की आकार न बदलल्यामुळे एटीएममधील बदलांचा सुरुवातीचा खर्च टळेल. प्रकल्प लहान मूल्यांच्या नोटांपासून सुरू होत असल्याने लक्षणीय बचत होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
लहान मूल्याच्याच नोटा का, याचे कारण असे की देशात १० आणि २० रुपयांच्या नोटा सर्वाधिक वापरल्या जातात. भाजी मार्केट, बस आणि ऑटोचे भाडे, तसेच लहान दुकाने अशा ठिकाणी त्या एका हातातून दुसऱ्या हातात जातात. जास्त वापरामुळे या कागदी नोटा लवकर फाटतात, त्यांचा रंग फिका पडतो किंवा त्या खराब होतात. त्यामुळे आरबीआयला दरवर्षी लाखो जुन्या नोटा नष्ट करून नवीन नोटा छापाव्या लागतात.
ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पॉलिमर नोटांच्या टिकाऊपणाकडे लक्ष वेधले. काही ठिकाणी पॉलिमर नोटा ३० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. वारंवार वापरल्या जाणाऱ्या कमी मूल्याच्या नोटांसाठी त्या विशेषतः उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटा सहज फाटत नाहीत. त्यांचे आयुष्य सामान्य नोटांपेक्षा ३-४ पट जास्त असते, तर कागदी नोटांचे आयुष्य फक्त १ ते २ वर्षे असते. पॉलिमर नोटा जास्त काळ टिकल्यास आरबीआयला अनेक वर्षे नोटा पुन्हा छापण्याची गरज भासणार नाही आणि छपाई खर्चात अब्जावधी रुपयांची बचत होईल.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने १,००० रुपयांच्या नवीन पॉलिमर नोटा जारी केल्याचा दावा करणारे काही फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारत सरकारच्या अधिकृत यंत्रणेने हा दावा खोटा ठरवला आहे. सध्या मोठ्या मूल्याच्या पॉलिमर नोटा आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे.
आरबीआय नवीन नोटा किंवा चलनविषयक धोरणातील बदलांची घोषणा कधीही सोशल मीडियाद्वारे करत नाही. ती माहिती आपल्या अधिकृत वेबसाइटवर किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकांद्वारे दिली जाते. त्यामुळे अशा व्हायरल पोस्ट किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नका आणि ते शेअरही करू नका.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.