आतड्यांचा कॅन्सर टाळायचाय? रोजच्या आहारात करा या भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
पूर्वी वयाच्या साठ किंवा सत्तर वर्षांनंतर दिसणारे आजार आता तरुण वयातच दिसू लागल्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आहारात कोणत्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा, हे जाणून घ्या.
हल्ली कोणताही गंभीर आजार होण्यास वयाची मर्यादा राहिलेली नाही. तरुण वयातील मुलामुलींपासून ते अगदी वयस्कर वृद्धांपर्यंत सगळ्यांना कॅन्सर, हार्ट अटॅक, रक्तदाब यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. जीवनशैलीतील बदलांचा थेट परिणाम शरीरावर झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. पूर्वीच्या काळी वयाच्या साठ किंवा सत्तर वर्षी होणारे आजार आता तरुण वयातच दिसू लागल्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
आतड्यांचा कॅन्सर हा याच बदलत्या ट्रेंडचे एक उदाहरण आहे. पूर्वीच्या काळी आतड्यांचा कॅन्सर हा वाढते वय आणि अनुवांशिकता यामुळेच होणारा आजार मानला जायचा. मात्र आता जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव आणि आहारातील पोषक घटकांची कमतरता यामुळे कोणत्याही व्यक्तीला हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. आतड्यांचा कॅन्सर हा सगळ्यात घातक कॅन्सरपैकी एक मानला जातो. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या वाढू शकतात.
केवळ काही अन्नपदार्थ किंवा भाज्यांच्या सेवनामुळे आतड्यांच्या कॅन्सरपासून पूर्णपणे बचाव होत नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पण योग्य पद्धतीने शरीराची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहू शकते. कामाच्या धावपळीमुळे किंवा सतत विकतचे जंक फूड खाण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींमध्ये या गंभीर आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते. याशिवाय प्रक्रिया केलेले पदार्थ, लाल मांस, रिफाइंड कार्ब्स आणि अतिरिक्त कॅलरीज असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते असे सांगण्यात येते.
याउलट आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जाण्यास मदत होते. अन्नपदार्थांमधून मिळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे संपूर्ण शरीराच्या सर्व अवयवांना पाठबळ देतात आणि आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
आतड्यांचा कॅन्सर होण्याच्या कारणांमध्ये शारीरिक हालचाली न करणे किंवा बैठी जीवनशैली, शरीराचे अनावश्यक वाढलेले वजन, लाल मांस तसेच हॉट डॉग आणि सॉसेजसारखे प्रक्रिया केलेले मांस खाणे आणि धूम्रपान करणे यांचा समावेश होतो.
बचावासाठी आहारात काय समाविष्ट करावे, याबद्दल सांगायचे झाल्यास सफरचंद, पेरू, संत्री, पेअर, बेरीज आणि पपई यांसारख्या फायबर असलेल्या फळांचा रोजच्या जेवणात समावेश असावा. पालेभाज्या, ब्रोकली, फ्लॉवर, कोबी, गाजर, बीन्स आणि मटार यांसारख्या भाज्यांचेही सेवन करावे. याशिवाय ओट्स, ब्राऊन राईस, गव्हापासून बनणारे पदार्थ आणि भरडधान्ये यांतूनही शरीराला आवश्यक तेवढे फायबर मिळते.