पोंभूर्णा येथे गणेश विसर्जनाला गालबोट, पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांत वाद
पोंभूर्णा शहरात २८ सप्टेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीत पोलीस आणि विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
पोंभूर्णा शहरातील गणेश विसर्जनाच्या वेळी गालबोट लागले. २८ सप्टेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन मिरवणूक सुरू असताना पोलीस आणि विघ्नहर्ता गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला आणि काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
पोंभूर्णा शहरातील दोन्ही गणेश विसर्जन सोमवारी ठेवण्यात आले होते. शिवाजी चौकात पोलिसांनी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सदस्यांना पुढे जाण्यासाठी घाई केली, त्यामुळे मंडळाचे सदस्य आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या दरम्यान काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
या कारवाईनंतर संतप्त झालेले मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त शहरातील सावित्रीबाई फुले चौकात काही वेळ ठिय्या आंदोलनाला बसले. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी रेटून धरली. जोपर्यंत या पोलिसांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही सावित्रीबाई फुले चौकातून उठणार नाही, अशी भूमिका मंडळाच्या सदस्यांनी घेतली.
प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोंभूर्णा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त आणि दंगल नियंत्रण पथक तैनात केले होते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. रात्री उशिरापर्यंत या घडामोडी सुरू राहिल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या वतीने गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
या प्रकरणी वाद घालणाऱ्या २१ जणांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर ७ जण फरार आहेत. त्यांच्यावर म.पो.अधिनियम १९५१ नुसार कलम १३६, ३८ तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ नुसार कलम ८५ (१) आणि भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), १८९(२), १८९(३), २२३, ४९ व १३२ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या १४ जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे करीत आहेत.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.