मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

जटपुरा गेटजवळ विसर्जन मिरवणुकीत अडथळा, चंद्रपूरचा राजा मंडळावर गुन्हा

विनापरवानगी मिरवणूक काढून वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांविरोधात गुन्हा दाखल.

जटपुरा गेटजवळ विसर्जन मिरवणुकीत अडथळा, चंद्रपूरचा राजा मंडळावर गुन्हा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट भागातील चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाने प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता विसर्जन मिरवणूक काढल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहर, रामनगर आणि दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ देखील सहभागी झाले होते. मिरवणूक जटपुरा गेटजवळ पोहोचल्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले, त्यामुळे मागून येणाऱ्या इतर गणेश मंडळांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी तेव्हा मध्यस्थी करून परिस्थिती निवळली आणि मंडळाला विसर्जन मार्गाकडे पाठवले. मात्र मंडळाने मूर्तीचे विसर्जन न करता ती परत मंडपात नेऊन ठेवली, असे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे २६ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील सुमारे ५० सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक निघणार होती. या मिरवणुकीआधी दुपारी सुमारे ४ वाजता चंद्रपूरचा राजा मंडळाने पोलीस आणि प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता आणि परवानगी न घेता पुन्हा अचानक विसर्जन मिरवणूक काढली. यामुळे मुख्य विसर्जन मार्गावर इतर मंडळांसाठी मोठा अडथळा निर्माण झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दवा बाजार, केवळराम चौक आणि रामसेतू पूल ते विसर्जन घाट हा रस्ता रुग्णवाहिका, नागरिक आणि रोजच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच रस्त्यावर परवानगीशिवाय काढलेल्या मिरवणुकीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या.

इतकेच नाही, तर विसर्जन घाटावर पोहोचल्यानंतरही मंडळाकडून विनाकारण तब्बल दोन ते तीन तास विसर्जनासाठी वेळ घालवण्यात आला. यामुळे मागे थांबलेल्या इतर सार्वजनिक गणेश मंडळांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले आणि त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, असे पोलिसांनी नमूद केले.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मिरवणूक काढणे आणि विसर्जनास विनाकारण विलंब लावणे, या बाबींची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ११३६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि २८५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ आणि १३८ नुसार चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जटपुरा प्रभागाच्या पदाधिकारी आणि सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ