गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांवर नोकरी: पुण्यात 14 पोलिसांसह 25 जणांना अटक

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांवर नोकरी: पुण्यात 14 पोलिसांसह 25 जणांना अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

कुराश आणि ड्रॅगनबोटची बनावट प्रमाणपत्रे वापरून सरकारी नोकरी मिळवल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

पुणे, दि. 29 - सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कुराश आणि ड्रॅगनबोट या खेळांची बनावट क्रीडा प्रमाणपत्रे तयार केल्याच्या प्रकरणात 14 पोलिसांसह एकूण 25 जणांना अटक झाली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सरकारी नोकरीतील 5 टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेऊन बनावट प्रमाणपत्रांच्या जोरावर पोलीस दलात आणि इतर शासकीय विभागांत भरती झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सरकारी नोकरी मिळवून देणाऱ्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. गेल्या 10 वर्षांत कुराश या खेळाची 1,500 हून अधिक बनावट प्रमाणपत्रे वाटली गेल्याचा पोलिसांना संशय आहे. महाराष्ट्र कुराश संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनाही अटक झाली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण 41 जणांवर गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 25 जणांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये 14 पोलीस कर्मचारी आहेत, आणि काही आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. यातील काही पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झाले होते, तर काही नुकतेच भरती झाले होते. घोटाळा उघड झाल्यानंतर बनावट प्रमाणपत्र वापरणाऱ्या 19 उमेदवारांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोपी उमेदवारांनी कोणत्याही क्रीडा स्पर्धेत प्रत्यक्ष भाग न घेताच ही प्रमाणपत्रे मिळवली होती. नाव समोर आल्यानंतर 5 ते 6 नवनियुक्त पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रांतून आणि राहत्या घरातून फरार झाले आहेत. त्यांची माहिती राज्यातील सर्व पोलीस घटकांना आणि प्रशिक्षण केंद्रांना पाठवण्यात आली असून, त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

हा घोटाळा फक्त पोलीस भरतीपुरता मर्यादित नाही. महसूल, कृषी किंवा इतर शासकीय विभागांतही या बोगस प्रमाणपत्रांवर नोकऱ्या मिळवल्याचा संशय आहे. म्हणून गुन्हे शाखा त्या विभागांना पत्र लिहून पडताळणी करत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत क्लास 1 आणि क्लास 2 पदांवर अशा प्रमाणपत्रांद्वारे कोणी रुजू झाले आहे का, हेही तपासले जात आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयातील ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी ही प्रमाणपत्रे वैध ठरवून मंजूर केली, त्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याने पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

ही गडबड कशी पकडली गेली, हे लक्षवेधी आहे. उमेदवारांनी सादर केलेली प्रमाणपत्रे 2018-19 मधील स्पर्धांची दाखवण्यात आली होती. मात्र ती तयार करताना त्यावर छत्रपती संभाजीनगर (जुने नाव औरंगाबाद) आणि धाराशिव (जुने नाव उस्मानाबाद) ही जिल्ह्यांची नवी नावे छापण्यात आली. महाराष्ट्र शासनाने या जिल्ह्यांची नावे 2023 मध्ये बदलली आहेत. मग 2018 च्या प्रमाणपत्रावर 2023 मध्ये बदललेली नावे कशी, असा प्रश्न क्रीडा पडताळणी अधिकाऱ्यांना पडला आणि या एका चुकीमुळे घोटाळा उघडकीस आला.

पोलिसांनी तपास सुरू केल्यावर असे समोर आले की, 2016 ते 2023 दरम्यान कोणत्याही अधिकृत स्पर्धा न घेताच, जिल्हा संघटकांकडून जुन्या तारखांचे बनावट रेकॉर्ड तयार करून ही प्रमाणपत्रे विकली गेली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय नोकरीत 5 टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट आणि कुराश संघटनेचे पदाधिकारी एका प्रमाणपत्रामागे उमेदवारांकडून 3 ते 5 लाख रुपये उकळत होते.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ