पाटील इस्टेटमध्ये तुटलेल्या चेंबरमुळे जीव धोक्यात; मनसेचा पुणे महापालिकेला दोन दिवसांचा इशारा
पाटील इस्टेट परिसरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पावसाळी गटाराच्या चेंबरचे झाकण अनेक महिन्यांपासून तुटलेले आहे. दोन दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पावसाळी गटाराच्या चेंबरचे झाकण गेल्या अनेक महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उड्डाणपुलाखाली, छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ, पाटकर प्लॉट येथील माधुरी स्नॅक्स सेंटरसमोर हे चेंबर आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. येत्या दोन दिवसांत चेंबरचे झाकण दुरुस्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
हा रस्ता अरुंद आहे आणि तो जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे इथे दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी गाड्यांची मोठी वर्दळ असते. छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही सतत ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी चेंबरचे झाकण तुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या चेंबरमध्ये गाड्यांचे टायर अडकून नुकसान झाले आहे आणि लहान-मोठे अपघातही घडले आहेत. गेल्या आठवड्यात एका लहान मुलाचा पाय चेंबरमध्ये अडकला आणि तो जखमी झाला, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.
झाकण दुरुस्त होत नसल्याने नागरिकांनी तात्पुरता उपाय म्हणून त्यावर लाकडी दरवाजा ठेवला आहे. पण गाड्यांच्या सततच्या वर्दळीमुळे तोही तुटत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी महापालिकेने तातडीने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
या समस्येबाबत स्थानिक नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी मनसेच्या पाटील इस्टेट येथील कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आणि पथ विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
येत्या दोन दिवसांत चेंबरचे झाकण दुरुस्त न केल्यास संबंधित कार्यालयासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना अँथोनी आढाव, संजय तोडमल, केरबा जौंजट, राजू भेकरे, रमेश साठे, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.