चौपदरीकरण, एलिव्हेटेड रोटरी, उड्डाणपूल आणि बाह्य वळणमार्गावर खासदार पटेल यांची अधिकाऱ्यांशी चर्चा
गोंदिया येथील उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार प्रफुल पटेल यांनी रस्ते कामांबाबत निर्देश दिले.
गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांतील रस्ते विकासाला वेग देण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी गांभीर्याने पुढाकार घेतला आहे. गोंदिया येथे आज राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला खासदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत बालाघाट टी पॉईंट येथे एलिव्हेटेड रोटरी उभारण्यावर चर्चा झाली. तसेच कोहमारा-घोटी आणि घोटी-गोंदिया मार्गाचे चौपदरीकरण आणि भंडारा जिल्ह्यातील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांवरही सविस्तर बोलणे झाले.
बालाघाट टी पॉईंट परिसरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन तिथे एलिव्हेटेड रोटरी उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशी सविस्तर चर्चा बैठकीत झाली.
कोहमारा ते घोटी दरम्यानच्या वनक्षेत्राबाहेरील रस्त्यांची (Non-Forest Stretches) तपासणी करून चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडावा, असे निर्देश देण्यात आले. घोटी ते गोंदिया मार्गाच्या चौपदरीकरणासाठी योग्य प्रस्ताव तयार करून तो विभागाकडे पाठवावा, असेही सांगण्यात आले. रस्ते विकासात जे भाग वनक्षेत्रात येतात, त्यासाठी वनविभागाशी तातडीने समन्वय साधून आवश्यक मंजुरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना खासदार पटेल यांनी दिल्या.
गोंदिया शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत आहे. पुढे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहराला बाह्य वळणमार्ग (बायपास) देता येईल का, याची व्यवहार्यता तपासणी (Feasibility Study) करण्याचे ठरले. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी होईल, अवजड वाहने शहराच्या बाहेरून जातील आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील रखडलेल्या व प्रलंबित रेल्वे उड्डाणपुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित सर्व विभागांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे आणि सर्व प्रलंबित बाबींचा त्वरित निपटारा करावा, असे निर्देश देण्यात आले.
भंडारा आणि तुमसर-बपेरा-खापा परिसरातील विकासकामांशी संबंधित अडचणी बैठकीत समजून घेण्यात आल्या. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी इतर विभागांशी समन्वय साधून सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीमुळे गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांतील पुढच्या काळातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा होण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत.