मानवतच्या सत्यभामा देशमाने शंभर मुलांच्या आजी, शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या लेकरांना दिली माया
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मंगरूळच्या सत्यभामा बाबाराव देशमाने आज स्नेहवनमधील शंभर मुलांची काळजी घेत आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा होते. संकटांशी लढण्याचे बळ, मायेची ऊब आणि त्यागाची शिकवण या रूपांतून मिळते, असे मानले जाते. काही माणसांच्या आयुष्यातही या रूपांचे दर्शन घडते. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मंगरूळच्या सत्यभामा बाबाराव देशमाने त्यापैकीच एक आहेत.
स्वतःच्या मुलाला कष्ट करून शिकवल्यानंतर सत्यभामा यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आपले मानले. सुरुवातीला त्या २० मुलांची आई झाल्या. आज त्या शंभर मुलांच्या आजी म्हणून त्यांच्यावर मायेची पाखर घालत आहेत. मातृत्व, त्याग आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचा हा प्रवास आहे.
सत्यभामा आणि त्यांचे पती बाबाराव हे वारकरी दाम्पत्य आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आठवड्याचा बाजार फक्त दहा रुपयांत करावा लागायचा. चूल पेटवायला शेजारच्या घरातून विस्तव आणण्याची वेळही सत्यभामा यांच्यावर आली. बाबाराव शेतीकामाबरोबर रात्री उशिरापर्यंत कंदिलाच्या उजेडात कपडे शिवायचे. गरिबीमुळे मुलाच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, म्हणून दोघांनी खूप कष्ट केले.
त्यांचा एकुलता एक मुलगा अशोक सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आणि पुण्यात नोकरीला लागला. पण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण आणि चांगले संगोपन मिळावे, म्हणून अशोक यांनी वयाच्या २६व्या वर्षी मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी 'स्नेहवन' हा सामाजिक प्रकल्प सुरू केला.
सुरुवातीला मुलाच्या भविष्याची काळजी सत्यभामा आणि बाबाराव यांना वाटली. पण शेवटी दोघांनी त्याच्या स्वप्नाला साथ द्यायचे ठरवले. गावची शेती आणि घर सोडून ते पुण्यात आले आणि या मुलांचे आजी-आजोबा झाले.
सुरुवातीला सत्यभामा यांनी २० मुलांसाठी एकट्याने स्वयंपाक केला. मुले आजारी पडली की रात्रभर जागून त्यांची काळजी घेतली. मुलांचे खाणेपिणे असो किंवा भावनिक आधार, प्रत्येक गोष्टीत त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आज त्या स्नेहवनच्या भोजनालयाची जबाबदारी सांभाळतात.
बाबाराव मुलांना गायन आणि मृदंग शिकवतात. त्यांना पक्षाघात झाला होता, पण त्यातून सावरल्यानंतरही मुलांना चांगले दूध मिळावे म्हणून ते गोशाळेचे काम पाहतात. अशोक आणि त्यांची पत्नी अर्चना हेही मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात.
सत्यभामा यांना इंद्रायणी थडी, राजमाता जिजाऊ, आदर्श मातापिता आणि ज्ञानप्रबोधिनीच्या राधामाता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पंढरीची वारी करणाऱ्या या दाम्पत्याने मुलांच्या सेवेसाठी स्वतःची वारी थांबवली. पण शंभर मुलांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात भक्तीची नवी वाट खुली झाली. स्वतःच्या लेकराइतके मातृत्व मर्यादित न ठेवता अनेक मुलांना मायेचे छत्र देणाऱ्या सत्यभामा देशमाने यांच्यात नवदुर्गेच्या ममतेचे आणि त्यागाचे दर्शन घडते.