सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:37 IST

एशियन पॅरा गेम्समध्ये भाविककुमार भरवाड अपात्र, रौप्य पदक काढून घेतले; दिलीप गावितला दुसरे सुवर्ण

पुरुषांच्या 400 मीटर टी-47 अंतिम शर्यतीत लेनच्या नियमाचे उल्लंघन केल्याने भारताच्या भाविककुमार भरवाडला अपात्र ठरवण्यात आले, तर दिलीप गावितने सुवर्णपदक जिंकले.

एशियन पॅरा गेम्समध्ये भाविककुमार भरवाड अपात्र, रौप्य पदक काढून घेतले; दिलीप गावितला दुसरे सुवर्ण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर टी-47 अंतिम शर्यतीत भारताच्या भाविककुमार भरवाड यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. लेनच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांनी जिंकलेले रौप्य पदक त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. एकीकडे भारताच्या एका खेळाडूवर ही वेळ आली असताना, दुसरीकडे दुसऱ्या भारतीय खेळाडूने सोनेरी कामगिरी केली आहे.

गुरुवारी जपानमधील नागोया सिटी मिजुहो पार्क एथलेटिक स्टेडियममध्ये ही शर्यत झाली. भाविककुमार 49.31 सेकंदांची वेळ नोंदवून दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांच्या पुढे आणखी एक भारतीय धावपटू, दिलीप महादु गावित (टी-46), होते. दिलीप यांनी 48.27 सेकंदांत शर्यत संपवून सुवर्णपदक पटकावले.

शर्यत संपल्यानंतर भाविककुमार यांना टीआर 18.2 (c) अंतर्गत नियमभंगासाठी अपात्र घोषित करण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी ठरवून दिलेल्या लेनचा नियम पाळला नाही, म्हणून ही कारवाई झाली.

भाविककुमार अपात्र ठरल्यामुळे जपानचा काकेरु इशिदा (49.58 सेकंद) दुसऱ्या स्थानावर आला. उज्बेकिस्तानचा मारुफजोन मुरोडुलोए आणि श्रीलंकेचा सामन सुबासिंघे यांना संयुक्तपणे तिसरे स्थान देण्यात आले. या दोघांनीही 50.03 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. हंगामातील दोघांचीही ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

भाविककुमार यांना अपात्र ठरवण्यात आले असले, तरी भारतासाठी चांगली बातमीही आहे. मराठमोळ्या दिलीप गावित यांनी या स्पर्धेतील आपले दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी त्यांनी पुरुषांच्या 100 मीटर टी-47 गटात सोन्याची कमाई केली होती.

दिलीप (टी-46 श्रेणी) यांनी 100 मीटर टी-47 स्पर्धेत 10.69 सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. भारतासाठी आणखी एक यश बेसिल यांनी मिळवले. बेसिल (टी-47 श्रेणी) यांनी 10.72 सेकंदांसह रौप्य पदक जिंकले आणि स्पर्धेतील नवा विक्रमही रचला.

दिलीप गावित यांनी याआधी एशियन पॅरा गेम्स 2022 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर टी-47 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ते त्या स्पर्धेतील भारताचे ऐतिहासिक 100 वे पदक होते. तसेच पॅरिस 2024 पॅरालम्पिकमध्ये पुरुषांच्या 400 मीटर टी-47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून त्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ