डॉक्टर आणि हॉस्पिटल्सच्या जाहिरातींना NMC ची चपराक, '१०० टक्के यश' आणि 'खात्रीशीर उपचार' सारखे दावे बंद
नॅशनल मेडिकल कमिशनने डॉक्टर आणि हॉस्पिटल्सच्या जाहिरातींबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या जगात रुग्णांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठे दावे करण्याचे प्रमाण वाढले आहे. 'शंभर टक्के यश' किंवा 'खात्रीशीर उपचार' अशा भूलथापा देणाऱ्या जाहिरातींच्या नादात अनेक जण आपल्या आरोग्याचा मोठा धोका पत्करतात. ही गंभीर समस्या रोखण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. डॉक्टर आणि हॉस्पिटल्सच्या जाहिरातींबाबत कमिशनने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
या नव्या आदेशामुळे वैद्यकीय क्षेत्राची गरिमा कायम राखली जाईल, तसेच सामान्य लोक दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचतील. आता कोणतेही हॉस्पिटल किंवा डॉक्टर आपल्या सेवांचा प्रचार करताना अतिशयोक्तीपूर्ण दावे करू शकणार नाहीत. NMC च्या या नव्या नियमांच्या कक्षेत वृत्तपत्रे, होर्डिंग्स आणि इन्स्टाग्राम-युट्यूबसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक डॉक्टर आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स किंवा पेड रिव्ह्यूचा आधार घेतात. यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
एनएमसीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचारापूर्वीचे आणि नंतरचे फोटो (Before-After Photos) दाखवणाऱ्यांवर कारवाई होईल. खोटे लाइक्स आणि व्ह्यूजच्या माध्यमातून आपली प्रतिमा उंचावणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन निलंबित करण्याची आणि भारी दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.
या नियमांमुळे आता कोणतीही व्यक्ती किंवा वैद्यकीय संस्था '१०० टक्के यश', 'खात्रीशीर उपचार', 'चमत्कारी इलाज', 'वेदनामुक्त उपचार' आणि 'नंबर-१ स्पेशलिस्ट' यांसारखे शब्द वापरू शकणार नाही. तसेच 'सर्वात उत्तम' किंवा 'सर्वात भरोसेमंद' असे दावे शास्त्रीय किंवा निष्पक्ष पुराव्यांनी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत करता येणार नाहीत.
डॉक्टरांना आपल्या प्रचारासाठी रुग्णांचे टेस्टिमोनियल्स किंवा शिफारशी वापरता येणार नाहीत. सोशल मीडियावर रुग्णांकडे रिव्ह्यू मागण्यासही मनाई करण्यात आली आहे. सेवांच्या प्रचारासाठी कोणत्याही सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
एआय (AI) ने तयार केलेल्या जाहिराती, स्पॉन्सर्ड पोस्ट तसेच बनावट फॉलोअर्स, लाइक्स आणि पेड रिव्ह्यू वापरणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय विनाकारण वैद्यकीय चाचण्या किंवा उपचारांसाठी लोकांना आकर्षित करणाऱ्या सवलती, कूपन्स, कॅशबॅक किंवा मोफत उपचारांच्या प्रचारालाही पूर्णपणे चाप लावण्यात आला आहे.