बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:48 IST

नेरळमध्ये नळातून आला साप; सम्राट नगरमधील घरात पाण्यात फिरताना दिसला

नेरळ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेतून सम्राट नगर भागातील एका घरात साप आल्याने पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न उभे राहिले आहेत. ग्रामपंचायतीने प्लंबर पाठवून तपास सुरू केला आहे.

नेरळमध्ये नळातून आला साप; सम्राट नगरमधील घरात पाण्यात फिरताना दिसला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उभे राहिले आहेत. यावेळी थेट नळाच्या पाण्यातून साप आल्याने गावात खळबळ उडाली आहे. नेरळ गावातील सम्राट नगर भागात राहणाऱ्या अशोक गोपीनाथ जाधव यांच्या घरी आज सकाळी हा प्रकार घडला.

नळाच्या पाण्यासोबत साप आल्याचे दिसताच जाधव यांच्या घरातील महिला गडबडून गेल्या. पाण्यात खेळणारा हा साप घरातही पाण्यात मोकळेपणाने फिरत होता. अशोक जाधव यांनी घरातील पाण्यात फिरणाऱ्या या सापाचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला.

या सापाची माहिती नेरळ ग्रामपंचायतीला देण्यात आल्यावर ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालयातील प्लंबर तत्काळ तिथे पाठवले. त्या भागात कुठे जलवाहिनी फुटली आहे का आणि फुटलेल्या जलवाहिनीतून साप पाण्याच्या पाइपमध्ये शिरला आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करूनच पाठवले जात आहे. त्या भागात कुठे पाइपलाइन लिकेज असल्यास हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्धार्थ सदावर्ते यांनी संपर्क केल्यानंतर तत्काळ प्लंबर पाठवले आहेत. तपास सुरू असून साप पाण्यासोबत कसा आला, याचा शोध घेतला जात आहे, असे कार्ले यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. तिथे प्रशासक राजवट असून ती सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. गावात जलशुद्धीकरण केंद्र असलेली नळपाणी योजना असूनही गढूळ आणि दूषित पाणी येण्याचे प्रकार थांबत नाहीत. आता पाण्यातून साप आल्याने या पाणीपुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेरळ हे मध्य रेल्वेने जोडलेले जंक्शन स्टेशन असलेले गाव आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांत इथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आणि गाव आता शहरी झाले आहे. गावापासून काही अंतरावरून उल्हास नदी वाहते आणि गावात चांगली नळपाणी योजना राबवली जात आहे. त्यामुळे नेरळमधील स्वच्छ पाणी हेच गावाचे नागरीकरण वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण ठरले आहे.

सप्टेंबर महिन्यातही नेरळ गावात गढूळ पाणी आले होते, त्यावेळी ग्रामपंचायतीचा कारभार चर्चेत आला होता. जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या या योजनेतून शुद्ध पाणी मिळते, म्हणून अनेक लोक इथे राहायला आले होते. आता गढूळ पाण्यानंतर थेट नळातून साप येऊ लागल्याने नेरळकरांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ