कर्जतमध्ये अदानी समूहाचा ८०० एकरवर 'पॉवर हब'? जमीन खरेदीला वेग
अदानी समूह कर्जत तालुक्यात साधारण ८०० एकर जमिनीवर 'पॉवर हब' उभारणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी जमिनी खरेदीला वेग आल्याचे सांगितले जात आहे.
देशातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाने कर्जतमध्ये 'पॉवर हब' उभारण्याच्या हालचालींना वेग दिल्याची चर्चा आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात जमिनी खरेदीचा धडाका लागला असून साधारण ८०० एकर जमिनीवर हा प्रकल्प होणार असल्याचे बोलले जात आहे. अदानींच्या या पॉवर हबमुळे बोरिवली परिसरात जमिनीचे भाव वाढले आहेत. मुंबईजवळ असल्यामुळे कर्जत तालुक्याला मोठे महत्त्व आले आहे.
अदानी समूहाकडून कशेळे परिसरात जमिनीची खरेदी सुरू आहे. त्या भागात पुण्यातील एका बांधकाम कंपनीची ३०० एकर एकसंघ जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्याच वेळी चोरिवली, सुगवे, तसेच धारेवाडी आणि रामाचीवाडी येथील जमिनींकडे समूहाने लक्ष वळवले आहे. तिथल्या साधारण ८०० एकर जमिनीवर अदानी समूह वीज प्रकल्प उभारणार असल्याची कुणकुण स्थानिक शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनीचे भाव वाढवले आहेत.
कर्जत तालुका पूर्वी 'फार्म हाऊसेस'चा तालुका म्हणून ओळखला जायचा. मागील २-४ वर्षांपासून तो रहिवासी संकुलांचा तालुका बनू पाहत होता. आपली 'कृषी प्रधान तालुका' ही ओळख या तालुक्याने गमावली आहे. फार्म हाऊसेस आणि सेकंड होममुळे तो 'डेस्टिनेशन कर्जत' बनला होता. त्यात टाटा, गोदरेज, लोढा, कोटक, व्हिडिओकॉन यांसारख्या मोठ्या बांधकाम कंपन्यांनी कर्जतमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करायला सुरुवात केली आहे.
उपनगरी रेल्वेने जोडलेल्या या तालुक्यात आता मोठ्या प्रमाणावर धरणे आणि वीज प्रकल्प येऊ घातले आहेत. १०० वर्षांपूर्वी टाटा समूहाने इथे वीज प्रकल्प सुरू केला होता. आता अनेक कंपन्या कर्जतमध्ये वीज प्रकल्प उभारायला उत्सुक असल्याचे दिसते आहे. टाटा समूहाचा दुसरा वीज प्रकल्प त्यांच्याच अतिरिक्त जमिनीवर होत आहे. दररोज हजारो मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेल्या टोरंट कंपनीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने पायघड्या घातल्या आहेत. त्यात आता देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाची भर पडली आहे.
हजारो एकर जमीन बांधकाम व्यावसायिक कंपन्यांकडे आहे. कर्जत तालुक्यात कोणत्याही प्रकारची औद्योगिक वसाहत नसल्याने फार्म हाऊसेस, सोसायट्या आणि आता रिसॉर्ट यांची साखळी तयार झाली आहे. मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट स्थानिक शेतकऱ्यांनीच उभारले आहेत, त्यामुळे पर्यटन व्यवसाय भरभराटीला आला आहे. मात्र धरणे आणि वीज प्रकल्प यांमुळे कर्जत तालुक्याचे जनजीवन बिघडण्याची शक्यता आहे.
अदानींसारख्या मोठ्या उद्योग समूहासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळाव्यात म्हणून मोठ्या एजंट लोकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे अदानी समूहाचा प्रकल्प होण्याची चर्चा खरी आहे, असे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. अदानी समूहाकडून मुंबईतील राजकीय मंडळी शेतकऱ्यांकडे येत असल्याचीही चर्चा आहे.