नेरळमधील गोरख शेप यांच्या उपोषणाला चौथ्या दिवशी आमदार थोरवेंची भेट, अनेक मागण्यांवर आश्वासने
आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर अनेक विषय मार्गी लागत आहेत, मात्र कल्याण-कर्जत रस्ता अतिक्रमणमुक्त होईपर्यंत उपोषण सुरू राहील, असे गोरख शेप यांनी सांगितले.
कर्जत तालुक्यात चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उपोषणकर्त्यांसाठी यशस्वी ठरला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर अनेक विषय मार्गी लागले आहेत. तरीही अतिक्रमणविरोधी कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार जाहीर करण्यात आला.
नेरळ गावातील नागरी समस्या आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यांच्याविरोधात सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी २८ सप्टेंबरपासून नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते नितीन सावंत यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
गुरुवारी आमदार महेंद्र थोरवे उपोषणस्थळी पोहोचले. शेप यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावले होते. थोरवे यांनी एक एक करून सर्व विषयांची माहिती घेतली. नेरळ नगरपरिषद किंवा नगरपंचायत व्हावी, यासाठी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले.
ग्रामपंचायतीतील मागील पाच वर्षांतील आणि प्रशासक काळातील गैरव्यवहारांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी १० दिवसांत सादर करावा, असे आदेश देण्यात आले. दोषींवर कारवाई करण्याची सूचना आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करू, असेही थोरवे यांनी म्हटले.
नेरळ गावातील डंपिंग ग्राउंडची जमीन कोणी हडप केली, असा आरोप केला जात आहे. जागा निश्चित करण्यासाठी ग्रामपंचायतीने मोजणीचे पैसे भरले आहेत. मोजणी करून जमीन बळकावल्याचे समोर आले तर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन आमदारांनी दिले.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात खऱ्या अर्थाने कचऱ्याचे विघटन व्हावे, यासाठी प्रशिक्षणापासून कार्यवाही सुरू केली जाईल, असे आश्वासन थोरवे यांनी दिले. नळपाणी योजना निधीअभावी रखडली आहे. त्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक घेतली जाईल आणि निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. ही नळपाणी योजना २०२७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
आमदार इथे आले आणि त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले, त्यामुळे उपोषणादरम्यान मांडलेले अनेक विषय मार्गी लागत आहेत, याबद्दल आमदारांचा आभारी आहे, असे गोरख शेप यांनी सांगितले. जोपर्यंत कल्याण-कर्जत रस्ता अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील, असे सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप म्हणाले.