बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

नागपुरात नमाज पठणासाठी जाणाऱ्या वसीम अख्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला, एक आरोपी अटकेत, तिघे पसार

केटी नगर भागात झालेल्या हल्ल्यात वसीम अख्तर गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर मुख्य आरोपीसह तिघांचा शोध सुरू आहे.

नागपुरात नमाज पठणासाठी जाणाऱ्या वसीम अख्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला, एक आरोपी अटकेत, तिघे पसार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपुरातील केटी नगर भागात वसीम अख्तर नावाच्या एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपीसह तिघे जण पसार झाले असून नागपूर पोलीस सध्या त्या तिघांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केटी नगर येथे घडली. वसीम अख्तर यांच्यावर धारदार शस्त्र आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला. वसीम अख्तर हे 43 वर्षांचे असून सूरज नगर येथे राहतात आणि गादी बनवण्याचे काम करतात.

रात्रीच्या वेळी ते नमाज पठणासाठी जात असताना चार आरोपींनी त्यांना घेरून हल्ला केला. या हल्ल्यात वसीम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मानकापूर येथील एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी जाफर नगर येथील अरमान खान याला अटक केली आहे. हल्ल्यात चार आरोपी होते, त्यापैकी एकाला अटक झाली आहे. मुख्य आरोपी शहनवाज खान आणि त्याच्यासोबतचे आणखी दोघे जण अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या तिघांचा शोध सध्या सुरू आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्य आरोपी शहनवाज खान याने आपल्या पहिल्या पत्नीला तलाक दिला होता. त्यानंतर संबंधित महिलेने वसीम यांच्याशी विवाह केला. याच कारणावरून या दोघांमध्ये वैमनस्य असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पीएसआय दीपक इंगळे यांनी दिली.

दरम्यान, दुसरीकडे नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना उघडकीस आली आहे. यात चोरट्यांनी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून सुमारे 70 हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. आशिष ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी सोन्याची अंगठी पाहण्यासाठी हातात घेतली आणि संधी साधून अंगठीसह पळ काढला.

त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन काही अंतरावर तयार होता. तिघेही दुचाकीवरून पसार झाले. दुकानदाराने चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र त्यांना पकडण्यात यश आले नाही. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ