सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:56 IST

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा बदल, सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात यंदा सेलिब्रिटींचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मेळावा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा बदल, सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दसरा जवळ आला की महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यांबद्दल मोठी उत्सुकता असते. त्यातही शिवसेनेच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईत येतात. यंदाच्या मेळाव्यासाठीही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत शिवसैनिकांची मोठी गर्दी होणार हे निश्चित असून दोन्ही गटांच्या नेत्यांची भाषणे ऐकायला मिळणार आहेत.

अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मेळाव्याच्या आयोजनात मोठा बदल केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमका कसा रंगणार, याची उत्सुकता वाढली आहे.

दरवर्षी शिवसेनेकडून मेळाव्यात मोठ्या प्रमाणात राजकीय शक्तिप्रदर्शन केले जाते. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात कोणाचा मेळावा सरस ठरतो, अशी एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते. त्यासाठी मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. दरवर्षी या मेळाव्यात सेलिब्रिटींचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि परफॉर्मन्स पाहायला मिळतात. पण यंदा या कार्यक्रमांना फाटा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

माहितीनुसार, यंदा मेळाव्यात थेट भाषणांनाच सुरुवात होईल. साधारण दोन ते अडीच तासांत कार्यक्रम संपवण्याचे नियोजन आहे. म्हणजेच मनोरंजनापेक्षा राजकीय भूमिका आणि नेत्यांच्या भाषणांवर जास्त भर असणार आहे.

गेल्या वर्षी पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यात आली होती. यंदा दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्याची तयारी शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मेळाव्यातील राजकीय भाषणांसोबत या मदतकार्याचीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाने पोस्टर प्रसिद्ध केले असून, त्यात हुकूमशाहीला दणका देण्यासाठी आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी एल्गार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणावर निशाणा साधणार आणि आगामी राजकीय घडामोडींवर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यांसोबतच नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम, नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा आणि भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा मेळावा यांच्याकडेही लक्ष असणार आहे. यंदा दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. कोणत्या नेत्याच्या भाषणातून कोणता राजकीय संदेश दिला जातो आणि कार्यकर्त्यांची किती गर्दी जमते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ