बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पूर्णेकर हत्या: पत्नीचा शिंदेंवर आरोप, 17 लाखांच्या मांडवलीसाठी माणूस पाठवल्याचा दावा

पूर्णेकर हत्या: पत्नीचा शिंदेंवर आरोप, 17 लाखांच्या मांडवलीसाठी माणूस पाठवल्याचा दावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 28 दिवस झाले आहेत. तरीही शिंदे सेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे या प्रकरणातले मुख्य संशयित आहेत आणि त्यांच्यावर अजून ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ठाण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंगळवारी ठाकरे गट आणि समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातून रात्रभर ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा आणि वाहतूक कोंडी बघायला मिळाली.

याच दरम्यान प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खळबळजनक आरोप केले आहेत. नौपाडा पोलीस स्टेशनबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट शिंदे यांचं नाव घेतलं. शिंदे साहेबांनी मांडवली करण्यासाठी माणूस पाठवला होता, असं त्यांनी सांगितलं. पूर्णेकर कुटुंबाच्या जीवाची किंमत त्यांनी 17 लाख रुपये लावली, असाही त्यांचा आरोप आहे. आम्ही 17 लाखांत विकले जाऊ असं त्यांना वाटलं, पण आमचं कुटुंब विकलं जाणार नाही, असंही विजेता पूर्णेकर यांनी स्पष्ट केलं.

प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर मंगळवारी, 27 ऑक्टोबरला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करायला निघाला होता. पण पोलिसांनी त्याला वाटेतच ताब्यात घेतलं आणि नौपाडा पोलीस स्टेशनला नेलं. ही बातमी पसरताच ठाकरे गट आणि मनसेचे स्थानिक नेते नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले. मंगळवारी दुपारपासून सुरू झालेलं हे आंदोलन मध्यरात्रीपर्यंत चालू होतं.

दुसरीकडे, पूर्णेकर यांच्या समर्थकांनी घोडबंदर रोड, कापूरबावडी नाका, मानपाडा, बाळकुम आणि कोलशेत रोड या भागांत जोरदार निदर्शनं केली. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. त्यामुळे मुंबई-ठाण्यावरून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मानपाडा भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेवटी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून रस्ते मोकळे केले आणि वाहतूक पूर्ववत केली.

या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. गुरुवारी, 29 ऑक्टोबरला, संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात 'महाआंदोलना'ची हाक देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि स्थानिक भाजप पदाधिकारीही यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पोलीस हा तपास अत्यंत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. गुन्हे शाखेचे जॉइंट सीपी पंजाबराव उगले आणि एसआयटीचे प्रमुख अमरसिंह जाधव यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.

घटनेनंतर लगेच पहिला आरोपी पप्या शिंदे याला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली. चौकशीनंतर निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक झाली असून, त्यांच्याकडून पिस्तूल आणि वाहनं जप्त करण्यात आली आहेत. तपासासाठी 23 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष पथक काम करत आहे. आतापर्यंत 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत आणि शेकडो CCTV फुटेज तपासण्यात आले आहेत.

मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी वारंवार बोलावण्यात आलं असून पुराव्यांची जुळवाजुळव सुरू आहे. आरोपी अमित सिंग याने दिलेल्या जबाबात हत्येमागे राजकीय कारण असल्याचा उल्लेख नाही. तपासाबद्दल समाजात गैरसमज पसरवले जात आहेत, पण पोलीस कोणत्याही दबावाशिवाय काम करत आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन करताना, काल कायदा हातात घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असल्याचंही त्यांनी म्हटलं. राम पूर्णेकर यांनी दिलेले पुरावे आणि CCTV फुटेज यांचीही सखोल तपासणी सुरू आहे, आणि लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ