बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीच्या मिठाईवरचा भेसळयुक्त चांदीचा वर्क घातक ठरू शकतो, किडनीला धोका

दिवाळीच्या मिठाईवरचा भेसळयुक्त चांदीचा वर्क घातक ठरू शकतो, किडनीला धोका छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

दिवाळीच्या तोंडावर मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्क भेसळयुक्त असेल तर किडनी आणि लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. खरा आणि नकली वर्क कसा ओळखायचा, ते पाहा.

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. राज्यासह संपूर्ण देशभरात सणाचा मोठा उत्साह आहे. घरोघरी फराळाची तयारी सुरू आहे आणि बाजारातही तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया दाखल झाल्या आहेत. काजू कतली, केशर पेढा आणि इतर अनेक पदार्थांवर चांदीचा किंवा सोन्याचा वर्क लावला जातो. या वर्कमुळे मिठाई जास्त सुंदर आणि आकर्षक दिसते. चमकणारी मिठाई पाहिली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण मिठाईवर लावलेला हा चांदीचा वर्क खरंच शरीरासाठी फायदेशीर असतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.

सणासुदीच्या दिवसांत बाजारातील मिठाई आणि इतर गोड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. पदार्थांच्या किमती वाढवूनही भेसळयुक्त माल ग्राहकांच्या हातात दिला जातो. अस्सल चांदीचा वर्क लावण्याऐवजी भेसळयुक्त आणि नकली वर्क लावून मिठाई विकली जाते. असा भेसळयुक्त वर्क शरीरासाठी विषासारखा मानला जातो. म्हणूनच सणाच्या काळात मिठाई घेताना नीट काळजी घेणं फार गरजेचं आहे, नाहीतर फसवणूक होऊ शकते.

जास्त नफा कमवण्याच्या नादात चांदीच्या ऐवजी ॲल्युमिनियम किंवा इतर स्वस्त आणि घातक धातू वापरून तयार केलेला वर्क मिठाईवर लावला जातो. असा भेसळयुक्त वर्क खाल्ला तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होऊन शरीरात अनेक बदल दिसू लागतात. ॲल्युमिनियम किंवा भेसळयुक्त धातू शरीरात दीर्घकाळ राहिला, तर पोटाचे आजार आणि मज्जासंस्थेचे विकार होतात, तसंच शरीरात विषारी घटक साचून राहतात.

मग मिठाई घेताना काय पाहायचं? मिठाईवरचा वर्क बोटाने हलकेच घासून बघावा. तो अस्सल चांदीचा असेल, तर लगेच पावडरसारखा बोटाला चिकटतो. ॲल्युमिनियम किंवा दुसऱ्या धातूचा असेल, तर तो मोडतो आणि हाताला खडबडीत लागतो.

दुसरी पद्धत म्हणजे वर्कचा एक छोटा तुकडा काढून जाळून पाहणे. अस्सल चांदीचा वर्क जळताना आकुंचन पावतो आणि त्याचा लहान गोळा तयार होतो. ॲल्युमिनियम किंवा भेसळयुक्त वर्क जळला, तर काळी किंवा तपकिरी राख उरते. शिवाय नकली वर्क पांढराशुभ्र असतो आणि डोळ्यांना सुईसारखा टोचतो, तर अस्सल चांदीचा वर्क थोडा सौम्य दिसतो. त्यामुळे बाजारात कोणतीही मिठाई घेताना या गोष्टी लक्षात ठेवून योग्य ती काळजी घ्यावी.

ही माहिती फक्त सर्वसामान्य माहितीसाठी आहे. यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ