नागपूर पदवीधर मतमोजणी: अनिल सोले यांना 274 मते, दुसऱ्या पसंतीची 41 मते वंजारी यांना
नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून भाजपचे सुधाकर कोहळे 4,244 मतांनी आघाडीवर आहेत. माघार घेतलेल्या अनिल सोले यांनाही 274 मते मिळाली आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गेल्या 30 तासांपासून सुरू आहे आणि ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पहिल्या दोन फेऱ्यांची मोजणी झाली. तेव्हा पहिल्या पसंतीच्या मतांचा ठरलेला कोटा कोणत्याच उमेदवाराला गाठता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू करावी लागली.
ताज्या अपडेटनुसार बाद फेरीत 28 उमेदवार बाद करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत भाजपचे सुधाकर कोहळे यांना 61,029 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना 56,785 मते मिळाली आहेत. म्हणजेच कोहळे सध्या 4,244 मतांनी आघाडीवर आहेत.
या मोजणीत आणखी एक लक्षवेधी गोष्ट समोर आली आहे. भाजपने नागपूर पदवीधरसाठी सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केली होती. अखेर 12 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल सोले यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर सोले यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा दिला होता. तरीही माघार घेतल्यानंतर काही पदवीधर मतदारांनी अनिल सोले यांना मतदान केले आहे.
सोले यांना पहिल्या पसंतीची 267 मते आणि पोस्टल बॅलेटमध्ये 7 मते मिळाली. अशी एकूण 274 मते त्यांच्या नावावर आहेत. या 274 मतांमधील दुसऱ्या पसंतीची मतेही आता मोजण्यात आली. त्यात अभिजीत वंजारी यांना दुसऱ्या पसंतीची 41 मते मिळाली, तर सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या पसंतीची 88 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना सोले यांच्या मतांमधून दुसऱ्या पसंतीची 10 मते मिळाली आहेत.
म्हणजेच सोले यांच्या मतांमधून भाजपचे उमेदवार कोहळे यांना दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते मिळाली असली, तरी सोले यांच्या मतदारांनी वंजारी यांनाही दुसरी पसंती दिली आहे, ही बाब लक्षणीय आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल पूर्णपणे स्पष्ट व्हायला आता थोडाच वेळ शिल्लक राहिला आहे. भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्याकडे सध्या तब्बल 4000 मतांची आघाडी आहे. त्यांनी ही आघाडी टिकवली, तर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.