सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:21 IST

महाळुंग्यात शाळेच्या गेटवर विद्यार्थिनीवर चाकूहल्ला; अल्पवयीन वर्गमित्र पोलिसांच्या ताब्यात

सहलीतील डान्सचा व्हिडिओ डिलीट करावा लागल्याच्या रागातून नववीतील मुलाने वर्गातील मुलीवर शाळा सुटताच चाकूने वार केले. मुलगी गंभीर जखमी आहे.

महाळुंग्यात शाळेच्या गेटवर विद्यार्थिनीवर चाकूहल्ला; अल्पवयीन वर्गमित्र पोलिसांच्या ताब्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पिंपरी : शाळेच्या सहलीत मुलींच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यावरून सुरू झालेला वाद अखेर एका वर्गमैत्रिणीवर चाकूहल्ला होण्यापर्यंत गेला. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील मुलीवर वार केले असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (दि. २३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास शाळा सुटली. मुलगी शाळेच्या प्रवेशद्वारावर असतानाच त्या विद्यार्थ्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्याने तिच्या छातीवर आणि डाव्या डोळ्याजवळ वार केले. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे.

बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, महाळुंगे गावात विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल ही शाळा आहे. या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांची सहल १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी आणि महाबळेश्वर येथे गेली होती. तिथे एका कार्यक्रमात मुली डान्स करत होत्या. त्याच वर्गातील मुलाने त्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर टाकला.

त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्या मुलाला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. हा वाद पाच दिवसांपूर्वी झाला होता. व्हिडिओ डिलीट करावा लागल्याचा राग मात्र त्याच्या मनात धुमसत होता, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे सगळे विद्यार्थी शाळेत आले होते. दुपारी दोनच्या सुमारास शाळा सुटली आणि त्यानंतर काही मिनिटांतच हा प्रकार घडला.

अल्पवयीन आरोपीला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने एक निवेदन जारी केले आहे. शाळेच्या परिसरात घडलेल्या घटनेमुळे आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे, असे त्यात म्हटले आहे. सध्या संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आमचे पूर्ण लक्ष आहे, असेही व्यवस्थापनाने म्हटले आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिली असून, त्यांच्या चौकशीत शाळा पूर्ण सहकार्य करत आहे. विद्यार्थ्यांना भावनिक आधार देण्यासाठी शाळेतील समुपदेशक काम करत आहेत.

शाळेने शिस्तविषयक नियमांनुसार हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले आहे. शाळेच्या परिसरातील सुरक्षा आणखी भक्कम करण्यासाठी तातडीने उपाय सुरू केले आहेत. वरिष्ठ वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या दप्तरांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिकता यावे, यासाठी इतरही प्रतिबंधात्मक उपाय केले जाणार असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ