लक्ष्मीपूजनात कमळाचे फूल का महत्त्वाचे? देवीला वाहताना या चुका टाळा
रविवारी, 8 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीचे लक्ष्मीपूजन आहे. पूजेत महालक्ष्मीला कमळ अर्पण करताना कोणती काळजी घ्यावी, ते पाहूया.
दिवाळी हा देशभर मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होणारा सण आहे. धनतेरसपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसांच्या या महोत्सवात यंदा रविवारी, 8 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी महालक्ष्मी आणि श्रीगणेश यांच्या पूजनाला विशेष महत्त्व असते.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी महालक्ष्मीला अतिशय प्रिय असलेले ताजे, टवटवीत कमळाचे फूल (Lotus Flower) पूर्ण भक्तिभावाने अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. हे फूल वाहताना कोणत्या चुका टाळाव्यात, याची माहिती पुढे दिली आहे.
दिवाळीच्या या पवित्र पर्वात प्रत्येक घरात विधिवत लक्ष्मीपूजन केले जाते. पण पूजेच्या साहित्यात माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी अनेकदा राहून जातात. त्यातलेच एक महत्त्वाचे फूल म्हणजे कमळ. धार्मिक मान्यतेनुसार, लक्ष्मीपूजनात देवीला कमळ अर्पण केले तर घरात वर्षभर सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो.
हिंदू पौराणिक ग्रंथांनुसार, महालक्ष्मीचा जन्म किंवा अवतार कमळाच्या फुलातूनच झाला, असे मानले जाते. म्हणूनच देवी लक्ष्मीची अनेक नावे कमळाशी जोडलेली आहेत, जसे की 'कमला' किंवा 'कमलासना', म्हणजे कमळावर विराजमान होणारी देवी. लक्ष्मीपूजनाच्या वेळी शक्यतो 'अष्टकमल', म्हणजेच आठ कमळाची फुले वाहण्याची प्रथा आहे.
कमळाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते चिखलात उगवते आणि चिखलातच राहते, तरीही त्याची शुद्धता आणि सौंदर्य कधी कमी होत नाही. याबद्दल गीतेतही सुंदर संदेश दिला आहे.
'ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा॥' या गीतेतील श्लोकानुसार, जो माणूस संकटात किंवा वाईट परिस्थितीत राहूनही आपल्या कर्मापासून आणि चांगुलपणापासून ढळत नाही, तो कमळाच्या पानासारखा असतो. ते पान पाण्यात राहूनही पूर्णपणे कोरडे आणि अलिप्त राहते. हाच मोठा संदेश कमळाचे फूल देते.
लक्ष्मीपूजनात कमळ अर्पण करताना पहिली काळजी म्हणजे उमललेली ताजी फुले वापरणे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला नेहमी ताजे, टवटवीत आणि पूर्णपणे उमललेले कमळाचेच फूल अर्पण करावे. दुसरी गोष्ट म्हणजे भक्तिभाव. कोणतेही फूल वाहताना ते अतिशय कोमलतेने आणि पूर्ण भक्तिभावाने देवीच्या चरणी समर्पित करावे.
पूजेत काही चुका चुकूनही करू नयेत. कोमेजलेले, सुकलेले, कीटकांनी खाल्लेले किंवा पाकळ्या तुटलेले कमळाचे फूल पूजेत अजिबात वापरू नये. तसेच फुले मोठ्या आदराने आणि पावित्र्याने आणावीत. त्यांची कोणत्याही प्रकारे विटंबना किंवा हलगर्जीपणा होता कामा नये.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.