किरॉन पोलार्ड आता मुंबई इंडियन्सचे मुख्य कोच, महेला जयवर्धनेची जागा घेतली
आयपीएल २०२७ च्या तयारीला लागलेल्या मुंबई इंडियन्सने माजी फलंदाज किरॉन पोलार्डकडे संघाच्या मुख्य कोचपदाची जबाबदारी दिली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आयपीएल २०२७ ला सुरुवात होण्याआधी पाच वेळा विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघाने मोठा निर्णय घेतला आहे. संघाचा दिग्गज खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक राहिलेला किरॉन पोलार्ड याची आता संघाचा मुख्य कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलार्डच्या आधी श्रीलंकेचा महान फलंदाज महेला जयवर्धने हा मुंबई इंडियन्सचा हेड कोच म्हणून काम पाहत होता. यावर्षी त्याने हे पद सोडले. त्यानंतर नीता अंबानी यांच्या संघाने ही जबाबदारी किरॉन पोलार्डच्या हाती सोपवली आहे.
मुंबई इंडियन्सच्या सहमालक नीता अंबानी यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, 'पोलार्ड २२ व्या वर्षापासून तरूण खेळाडू म्हणून MI सह जोडला गेला आणि तब्बलगेल्या १६ वर्षांपासून तो या कुटुंबाचा अविभाज्य भाग राहिला आहे.' पोलार्ड आपला अनुभव, समजूतदारपणा आणि वचनबद्धता यांच्या जोरावर संघाला एकत्र ठेवेल आणि यशाचा नवा अध्याय सुरू करेल, असा विश्वासही नीता अंबानी यांनी बोलून दाखवला.
नवी जबाबदारी मिळाल्यावर पोलार्डनेही आपला आनंद आणि सन्मानाची भावना दोन्ही व्यक्त केली. त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, 'Mumbai Indians च्या हेड कोचची जबाबदारी पेलणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा आणि करिअरचा खूप मोठा भाग आहे आणि हा संघ, खेळाडू आणि पलटणसह माझं जे नातं आहे ते अत्यंत अनोखं आणि अनमोल आहे. एक खेळाडू आणि एक कोच म्हणून काम केल्यानंतर मुंबई इंडियन्सचे हे प्रतिनिधित्व किती महत्त्वाचे आहे आणि ही निळी जर्सी घातल्यानंतर किती जबाबदारी येते याची पूर्ण कल्पना आहे'
पोलार्डची मुंबई इंडियन्ससोबतची कारकीर्द शानदार आणि अत्यंत यशस्वी राहिली आहे. फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते.
मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या पाचही विजेत्या संघांचा पोलार्ड भाग होता आणि त्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. आयपीएल व्यतिरिक्त २०११ आणि २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग टी२० जिंकली, तेव्हाही पोलार्डने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आकड्यांतही त्याची कामगिरी उठून दिसते. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने १८९ आयपीएल सामन्यांत १४७.३२ च्या स्ट्राईक रेटने ३,४१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय आपल्या मध्यमगती गोलंदाजीने त्याने संघासाठी ६९ महत्त्वपूर्ण बळीही घेतले.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर पोलार्डने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. आता मुख्य प्रशिक्षक म्हणून झालेल्या नियुक्तीमुळे त्याचे मुंबई इंडियन्ससोबतचे १६ वर्षांचे नाते एका नव्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.