खर्डी ते कसारा तिसरी रेल्वेमार्गिका खुली, ताशी 100 किलोमीटर वेगाने धावणार गाड्या
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-कसारा मार्गावर खर्डी ते कसारा स्थानकांदरम्यान तिसरी रेल्वेमार्गिका उभारण्यात आली आहे. या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) अधिकृत मंजुरी दिली आहे. मुंबई आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. कल्याण-कसारा हा मार्ग मध्य रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वेवर लोकल गाड्यांचा रोज होणारा खोळंबा थांबेल आणि लोकलला लागणारा लेटमार्क इतिहास जमा होण्याची शक्यता आहे.
टिटवाळा, आसनगाव आणि कसारा परिसरासह उपनगरी भागातून रोज लाखो लोक कामासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. पण या मार्गावर लोकल, लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस आणि मालगाड्या यांची वाहतूक करण्यासाठी मोजक्याच मार्गिका होत्या. त्यामुळे गाड्या चालवण्यावर मोठा ताण येत असे. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांना वाट मोकळी करून देताना उपनगरी लोकलचे वेळापत्रक बिघडत असे आणि त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागे. आता हा तिसरा मार्ग सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाला गाड्यांचे नियोजन करण्यासाठी चांगला पर्याय मिळाला आहे.
कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेमार्गाचा हा संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्प 67 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी कसारा ते खर्डी दरम्यानचा 13.53 किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्णपणे तयार झाला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी 17 ऑक्टोबर रोजी या नव्या मार्गाची कसून पाहणी केली. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वे चालवून या मार्गावर वेगाची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गावर ताशी 100 किलोमीटर वेगाने गाड्या चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
सुरक्षिततेची खबरदारी म्हणूनही काही निर्देश देण्यात आले आहेत. खर्डी स्थानकाच्या यार्डातील काही सिग्नलच्या पायाभरणीत किरकोळ त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे संबंधित सिग्नलच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 100 मीटर अंतरापर्यंत ताशी 30 किलोमीटर इतकी वेगमर्यादा लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तिसरा मार्ग सुरू झाल्यामुळे गाड्यांच्या संचालनात आणि वेळेच्या व्यवस्थापनात मोठी सुधारणा होईल, यात शंका नाही. पण या प्रकल्पामुळे प्रवासाचा नेमका किती वेळ वाचणार, किंवा मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकल फेऱ्या वाढवल्या जाणार का, याबाबत रेल्वे प्रशासनाने अजून कोणतीही निश्चित घोषणा केलेली नाही. तरीही या नव्या सुविधेमुळे कसारा मार्गावरील चाकरमान्यांच्या रोजच्या प्रवासातील मोठा ताण नक्कीच कमी होणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.