गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
14:48 IST

कर्जमुक्तीनंतरही नवे पीक कर्ज नाही, सावलीतील संस्थेचे अध्यक्ष लोडे यांचे निवेदन

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

कर्जमुक्तीनंतरही नवे पीक कर्ज नाही, सावलीतील संस्थेचे अध्यक्ष लोडे यांचे निवेदन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मिळाला, हे खरे आहे. मात्र आता शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जाची अत्यंत गरज असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या संदर्भात सेवा सहकारी संस्था मर्या. मंगरमेंढा (र.जि. ६७४, ता. सावली, जि. चंद्रपूर) चे अध्यक्ष खुशाल था. लोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना दोन स्वतंत्र निवेदने दिली आहेत. ही निवेदने सावलीच्या तहसीलदारांमार्फत देण्यात आली.

सन २०२६ च्या चालू हंगामातील नवीन पीक कर्जाची प्रकरणे संस्थेने बँकेकडे सादर केली. तेव्हा जिल्हा बँक सन २०२६-२७ चा पीक पेरा नोंद असलेला ७/१२ मागत आहे. पण सन २०२६-२७ चा पीक पेरा अजूनही अपलोडच झालेला नाही. त्यामुळे ७/१२ वर २०२५-२६ चीच नोंद दिसते.

पीक कर्ज वाटपाची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबरला अर्ज देऊन ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली. तरीही जिल्हा बँकेच्या एआरओ यांनी फोनवरून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटू नये, असे तोंडी आदेश दिले आणि त्यामुळे वाटप ठप्प झाले आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हात उसने पैसे घेऊन, तर काहींनी सावकाराकडून कर्ज घेऊन जुन्या पीक कर्जाचे व्याज भरले आणि कर्ज निल केले. आता नवीन कर्ज मिळत नसल्याने त्यांची फरफट होत आहे. सेवा संस्था आणि शेतकरी सभासदांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

या वर्षीच्या हंगामात पाऊस अत्यल्प आहे आणि कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. पिके पाण्याविना करपत चालली असून उत्पन्नात ६० टक्के घट आली आहे. दुसरीकडे महागडी औषधे, महागडी खते, रोवणीचा खर्च, निंदणीचा खर्च आणि पीक कापणीचा खर्च गगनाला भिडला आहे. अशा स्थितीत शेतकरी हतबल झालेला असताना बँकेने पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी खाईल काय आणि जगेल काय, असा प्रश्न आहे. अशा वेळी बँकेने आधार द्यायला हवा, पण तसे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांचा वाली कुणी आहे की नाही, मग देश कृषिप्रधान कसा होईल, फक्त मोठमोठ्या सभांमध्ये भाषण ठोकण्यापुरताच शेतकरी उरला आहे काय, त्याच्या अडचणी दिसत नाहीत काय, रात्रंदिवस शेतात राबून शेवटी त्याच्या हातात काय शिल्लक राहते, हा सवाल आज प्रत्येक शेतकरी विचारत आहे.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नवीन पीक कर्ज वाटपाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी निवेदनात आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपल्या स्तरावरून पत्राद्वारे नवीन पीक कर्ज मंजूर करण्याबाबत कळवावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्या कार्यालयास कळवावा, असेही म्हटले आहे. अशी नम्र विनंती अध्यक्ष खुशाल लोडे, शेतकरी विविध सेवा सहकारी संस्था, मंगरमेंढा यांनी केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ