कमळीचा नवा लूक: दिवाळीत महाजनांच्या घरी अन्नपूर्णा आजी करणार नातीचा मेकओव्हर
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
झी मराठीवरील 'कमळी' मालिकेत दिवाळीच्या मुहूर्तावर कमळी नव्या रूपात दिसणार आहे. लग्नसोहळ्यादरम्यान ती कबड्डीच्या स्पर्धेसाठी जाण्याचा निर्णय घेते आणि हृषी तिला साथ देतो.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी' सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेतील कमळीचा साधा लूक, दोन वेण्या आणि साधे कपडे याची प्रेक्षकांमध्ये नेहमीच खास चर्चा असायची. अनेकदा चाहत्यांनी कमळीचा लूक बदलावा, अशी मागणीही केली होती.
आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कमळी नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मालिकेत कमळीच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. भूतकाळातील सत्य समोर आल्यानंतर कमळी ही महाजन कुटुंबाची मोठी नात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आजी आपल्या लाडक्या नातीचा मेकओव्हर करणार आहेत. नव्या लूकमध्ये कमळीचे मोकळे केस, कपाळावरची चंद्रकोर, नाजूक कानातले आणि सुंदर ड्रेस असा खास अंदाज पाहायला मिळणार आहे. फक्त कमळीच नाही, तर तिची आई गौरी हिचाही लूक बदललेला दिसणार आहे. मायलेकींचा हा नवा अंदाज प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कमळीचा बदललेला लूक दिसतो. विशेष म्हणजे, आता कमळी आणि हृषी यांच्या लग्नसोहळ्याची तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, या आनंदाच्या क्षणी मालिकेत एक अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे.
लग्नसोहळ्यादरम्यान कमळी कबड्डीच्या स्पर्धेसाठी जाण्याचा निर्णय घेते. आपल्या स्वप्नांसाठी ती चक्क भर लग्नातून निघून जाण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळी हृषी तिला अडवतो. कमळीला लपून जाण्याची गरज नाही, असे सांगत तो तिच्या स्वप्नांना पाठिंबा देतो. "स्वत:चं ध्येय पूर्ण करण्यासाठी जाताना अशी लपून का जातेस? जा गड जिंकून ये. मी इथेच तुझी वाट बघेन," असे म्हणत हृषी तिचा आत्मविश्वास वाढवतो.
हृषीने दिलेल्या या साथीमुळे कमळीला आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्याचे बळ मिळणार आहे. एकीकडे कमळीचा मेकओव्हर आणि महाजनांच्या घरातील तिची नवी ओळख, तर दुसरीकडे तिच्या कबड्डीच्या स्वप्नांना मिळणारी हृषीची साथ, असे अनेक रंजक प्रसंग आगामी भागांमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे कमळीच्या आयुष्यात पुढे नेमके काय घडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.