बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
17:10  वाठोड्यातील कचरा वर्गीकरण प्रकल्पात ट्रॉमल मशीनमध्ये अडकून २८ वर्षांच्या कामगाराचा मृत्यू 08:10  नागपूरच्या गोधनी रोडवर ट्रकने महिलेला चिरडले, दिवाळीच्या खरेदीला निघाले होते कुटुंब 00:10  नागपूरच्या गोधनी रोडवर भरधाव टिप्परने महिलेला चिरडले, मूल जखमी; २० दिवसांत दुसरा बळी 15:40  नागपूर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदायला बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सुधारित आदेश 09:57  नागपूर जिल्ह्यात नवे बोअरवेल खोदायला आणि जुने बोअरवेल खोल करायला पुढच्या आदेशापर्यंत मनाई 3 नोव्ह | 20:23  नागपूरच्या गोधनी रोडवर ट्रकच्या धडकेत अश्विनी फलके यांचा जागीच मृत्यू, गावकऱ्यांचा रास्ता रोको
सर्व थेट अपडेट

तुळजाभवानीचे मूळ दैवी रूप ८ नोव्हेंबरच्या भागात; उर्वी पाध्ये यांचे मालिकेत पदार्पण

तुळजाभवानीचे मूळ दैवी रूप ८ नोव्हेंबरच्या भागात; उर्वी पाध्ये यांचे मालिकेत पदार्पण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत देवीचे अष्टभुजा रूप प्रकट होणार आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर रविवारी ८ नोव्हेंबरच्या भागात हे रूप दिसेल.

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत सध्या मोठे नाट्यमय वळण आले आहे. देवी तुळजाभवानीचे मूळ दैवी रूप आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर, येत्या रविवारी ८ नोव्हेंबरच्या भागात या दिव्य रूपाची प्रचिती मिळणार आहे.

मालिकेतील कथानकात महिषासुराने कपटाने चातुर्मासाची पोथी हस्तगत केली आहे. त्याची पत्नी शुंभा हिच्यासह त्याने धर्माचे राज्य संपवण्यासाठी नवा कट रचला आहे. लोकांच्या मनातली भक्ती संपावी म्हणून चातुर्मास संपल्याची खोटी आवई उठवली जात आहे. महिषासुराच्या अंशातून जन्माला आलेल्या मल्लासुराने सृष्टीत हाहाकार माजवला आहे. महिषासुर आणि दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी रचलेला हा कपटी डाव अशा वळणावर पोहोचला आहे की धर्माच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष आदिशक्तीला दैवी तत्त्वाला बळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.

बालरूपातील तुळजा आणि मल्लासुर यांच्यातील युद्धादरम्यान मल्लासुर दैवी सामर्थ्य संपल्याचा दावा करतो आणि विजयाचा उन्माद व्यक्त करतो. पण त्याच क्षणी आदिशक्तीच्या मार्गदर्शनानुसार महादेव, विष्णू आणि ब्रह्मदेव आपापले दिव्य अंश बालरूपातील तुळजाईला देतात. तिन्ही देवांच्या शक्तींचा संगम होताच अग्नीच्या प्रचंड उग्र वादळातून अष्टभुजा महाशक्तीच्या रूपात देवी तुळजाभवानीचा भव्य मूळ दैवी अवतार प्रकट होतो. सुवर्ण अग्निज्वाळांच्या पार्श्वभूमीवर साकारलेले हे रूप प्रेक्षकांसाठी अद्भुत दृश्यानुभव ठरणार आहे.

आदिशक्तीने स्वतः पुढाकार घेऊन घडवलेली ही महाशक्ती स्वरूपिणी दैवीलीला आसुरी प्रवृत्तीच्या संहाराचा निर्णायक टप्पा सुरू करणारी आहे. येणारा प्रत्येक भाग चुकवू नये असा आहे, असे मालिकेबद्दल सांगितले जाते. पौराणिक भव्यता आणि आधुनिक एआय तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम असल्याने ही मालिका सध्या विशेष लोकप्रिय ठरली आहे.

या नव्या रूपाबद्दल आणि भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री उर्वी पाध्ये म्हणाली, "प्रत्येक कलाकाराचे मुख्य भूमिका साकारण्याचे स्वप्न असते आणि माझ्या पहिल्याच मालिकेत मला आई तुळजाभवानीची भूमिका साकारायला मिळणे ही मी देवीची सर्वात मोठी कृपा समजते. ही एक पौराणिक मालिका असल्याने भाषेचा भारदस्तपणा, आवाजातील ठामपणा जपण्यासाठी विशेष सराव, स्क्रिप्ट वाचन आणि दिग्दर्शकांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. भूमिकेसाठी पौराणिक अभ्यास, युद्धप्रसंगांसाठी शारीरिक व मानसिक तयारी करताना सुरुवातीला दडपण आले होते; पण त्यावर मात करत मी शिकत गेले. सेटवर माझी पहिली एंट्री शूट होताना आजूबाजूला 'आई राजा उदो उदो'चा गजर आणि अंगावर पडणाऱ्या फुलांच्या पाकळ्यांचा तो क्षण अत्यंत भावुक करणारा होता, ज्याने मला एका अद्भुत सकारात्मक ऊर्जेची प्रचिती दिली."

उर्वी पुढे म्हणाली, "तुळजाभवानीचे ममत्व आणि अन्यायाविरुद्ध लढणारे रौद्र रूप हे दोन्ही पैलू मला खूप भावले. माझा स्वभाव मूळचा शांत असल्याने तिचे रौद्र रूप साकारणे माझ्यासाठी वेगळे आव्हान होते. मॉनिटरवर स्वतःला देवीच्या रूपात पाहिले तेव्हा माझे डोळे पाणावले होते आणि देवी पाठीशी असल्याची तीव्र जाणीव झाली. कोल्हापूरची महालक्ष्मी ही आमची कुलस्वामिनी आहे. आई महालक्ष्मी आणि आई तुळजाभवानी यांच्याबद्दल माझ्या मनात अपार श्रद्धा आहे. देवीच्या आशीर्वादानेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. अजून मला तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची संधी मिळालेली नाही; पण लवकरच हा योग यावा, अशी मनापासून इच्छा आहे. शूटिंगच्या सुरुवातीलाच आलेल्या दिव्य अनुभवांमुळे माझी श्रद्धा आणि भक्ती अधिकच दृढ झाली आहे."

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ