जटपुरा गेटला पडल्या भेगा, तज्ज्ञांकडून तपासणीची मुनगंटीवारांची मागणी
चंद्रपूरच्या जटपुरा गेटच्या दगडी बांधकामातील सांध्यांमध्ये फटी निर्माण झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुरातत्त्व तज्ज्ञांकडून पाहणी आणि शास्त्रोक्त दुरुस्तीची मागणी केली आहे.
चंद्रपूर येथील जटपुरा गेटच्या संरक्षणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. या वास्तूच्या दगडी बांधकामातील सांध्यांमध्ये फटी निर्माण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तज्ज्ञांमार्फत तपासणी करावी आणि शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही मागणी त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी, चंद्रपूर तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाच्या अधीक्षक पुरातत्त्वज्ञांकडे केली आहे. जटपुरा गेट चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाचा भाग आहे आणि गोंडकालीन वैभवाची साक्ष देणारी वास्तू आहे. गेटच्या अंतर्गत बाजूला दगडांमधील सांधे अनेक ठिकाणी उघडले असून बांधकामात मोठ्या प्रमाणात फटी पडल्या आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या स्थितीचा वास्तूच्या संरचनात्मक स्थैर्यावर काय परिणाम होऊ शकतो, ते तज्ज्ञांनी तपासावे, असे मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तांत्रिक दुरुस्ती केली, तर पुढे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. इतिहासाचा हा ठेवा काळाच्या ओघात दुर्लक्षित राहू नये आणि वास्तूच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने हालचाल व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ अधिकारी आणि अभियंत्यांनी गेटची तातडीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी, अशी मागणी आहे. दगडांमधील सांधे, फटी, बांधकामाची झीज आणि दगडांची स्थिरता यांचे सविस्तर तांत्रिक मूल्यमापन करावे, असेही सुचवण्यात आले आहे. तपासणीत संरचनेला तातडीचा धोका आढळला, तर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संभाव्य दुर्घटना टाळावी, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
दुरुस्ती करताना केवळ वरवरचे काम न करता वास्तूची मूळ स्थापत्यशैली आणि ऐतिहासिक स्वरूप अबाधित राहील, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. पुरातत्त्वीय तत्त्वांनुसार दुरुस्तीचा तांत्रिक आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करून काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशीही मागणी पत्रात आहे.
भविष्यात गेटचे नुकसान होऊ नये, यासाठी नियमित देखभाल, वेळोवेळी तांत्रिक तपासणी आणि संरचनात्मक स्थितीच्या निरीक्षणाची कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची गरजही मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. स्थळपाहणीचे निष्कर्ष, तांत्रिक मूल्यमापन, प्रस्तावित दुरुस्तीची कार्यपद्धती आणि कामासाठी ठरवलेली कालमर्यादा यांचा सविस्तर अहवाल द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे.
ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाल्यानंतर तिचे मूळ स्वरूप पूर्ववत करणे अनेकदा कठीण ठरते, त्यामुळे नुकसान वाढण्याची वाट न पाहता वेळीच संरक्षणात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे, असे पत्रात म्हटले आहे. जटपुरा गेटचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन आणि संवर्धन करून हा अमूल्य वारसा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवावा, अशी आग्रही भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.