इन्स्टाग्रामच्या शेअर मेनूत मेटाचा नवा MUSE AI एजंट, तिकीट ते खर्चाच्या नियोजनात मदत
मेटाचा MUSE हा AI एजंट इन्स्टाग्रामच्या शेअर मेनूमध्ये दिसू लागला आहे. हे फीचर अजून भारतात आलेलं नाही आणि मेटा सध्या त्याची टेस्टिंग करत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक नवी अपडेट समोर आली आहे. आता इन्स्टाग्रामच्या शेअर मेनूमध्ये MUSE नावाचा एक नवा ऑप्शन दिसू लागला आहे. वरवर पाहिलं तर हा पोस्ट शेअर करण्याचाच एखादा पर्याय वाटेल, पण तसं नाही. MUSE हा मेटाचा नवा AI एजंट आहे आणि तो तुमचा पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणार आहे. तुमची रोजची कामं तो चुटकीसरशी करून देणार आहे.
MUSE नेमकं काय करणार, ते आधी बघू. तुम्हाला फिरायला जायचंय आणि तिकीट काढायचंय, हॉटेल किंवा रेस्टॉरंट बुक करायचंय, एखाद्या कामाचा रिमाइंडर लावायचा आहे किंवा महिन्याचा खर्च कुठे झाला याचा हिशोब ठेवायचा आहे, तर ही सगळी कामं तुम्ही MUSE ला सांगू शकता. तो ती चॅटमध्येच पूर्ण करून देईल.
याआधीचे AI चॅटबॉट फक्त माहिती द्यायचे. तुम्ही प्रश्न विचारला की ते उत्तर द्यायचे आणि विषय संपायचा. MUSE तसा नाही. हा Action-Oriented एजंट आहे. म्हणजे तुमचं काम काय आहे हे तो आधी समजून घेतो, मग त्यासाठी लागणारा पूर्ण प्लॅन बनवतो आणि तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदतही करतो. फक्त सांगून थांबत नाही, तर करून दाखवतो.
इन्स्टाग्राममध्ये MUSE कसा दिसतो? तुम्ही एखादी रील किंवा पोस्ट शेअर करायला जाता, तेव्हा खाली जे ऑप्शन्स येतात तिथे आता MUSE चं नाव दिसतं. त्यावर क्लिक केलं की मेटाच्या MUSE अॅपची लिस्ट उघडते आणि तिथे MUSE ला तुमचा पर्सनल AI एजंट म्हणून दाखवलं जातं.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फीचर अजून भारतात आलेलं नाही. फक्त ऑप्शन देण्यात आला आहे, मेन चॅटबॉक्स अजून आलेला नाही. मेटा सध्या त्याची हळूहळू टेस्टिंग करत आहे. त्यामुळे सगळ्या युजर्सपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल.
तिकिटापासून बिलापर्यंत सगळं सांभाळण्याची MUSE ची खासियत आहे. छोटी पण वेळ खाणारी कामं तो सोपी करतो. समजा तुम्हाला ट्रेन किंवा फ्लाईटचं तिकीट बुक करायचं आहे. MUSE तिकिटाच्या किमतीवर लक्ष ठेवायला मदत करेल आणि योग्य वेळी बुकिंग करायला सांगेल. ईमेलवर एखादा फॉर्म आला असेल आणि तो कसा भरायचा कळत नसेल, तर तो फॉर्म भरायलाही MUSE मदत करतो. तो रिमाइंडरही लावून देतो, त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम राहून जाणार नाही.
MUSE फक्त बुकिंगपुरता मर्यादित नाही, तर तुमच्या पैशाचं नियोजनही करणार आहे. महिन्याला तुम्ही कुठे किती खर्च करता याचा तो आढावा घेईल आणि अनावश्यक खर्च कुठे होत आहेत ते शोधून काढेल. उदाहरणार्थ, तुमची दोन-तीन ठिकाणी सब्सक्रिप्शन्स चालू असतील आणि त्यातली काही तुम्ही वापरत नसाल, तर कोणतं बंद केलं तर पैसे वाचतील हे MUSE सांगेल.
पण पैसे खर्च करायचे किंवा पेमेंट करायचं, हा निर्णय शेवटी तुमचाच असणार आहे. MUSE फक्त योग्य सल्ला देईल. एकंदरीतच, MUSE मुळे इन्स्टाग्राम हे फक्त फोटो-व्हिडिओ बघण्याचं अॅप न राहता तुमच्या रोजच्या कामात मदत करणारा स्मार्ट पार्टनर बनणार आहे.