ह्युंदाईची 7 सीटर क्रेटा येणार, मोठ्या कुटुंबांसाठी नवा पर्याय; अल्काजारचे काय होणार?
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ह्युंदाई क्रेटाचे थर्ड-जेनरेशन मॉडेल 5 सीटर आणि 7 सीटर अशा दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये येण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय बाजारात सर्वाधिक लोकप्रिय असलेली एसयूव्ही म्हणजे ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta). ही गाडी आता नव्या रूपात ग्राहकांसमोर येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी क्रेटाचे थर्ड-जेनरेशन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीत या प्रकल्पाला 'SX3' असे कोडनेम देण्यात आले आहे. याच नव्या जनरेशनसोबत 7 सीटर मॉडेलही बाजारात उतरवण्याची कंपनीची तयारी आहे. मोठ्या कुटुंबांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.
सध्या ह्युंदाईची तीन रो असलेली एसयूव्ही म्हणून 'अल्काजार' बाजारात आहे. मात्र नवी 7 सीटर क्रेटा आली, तर कंपनी अल्काजार बंद करू शकते, अशी चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अल्काजारला 'क्रेटा ग्रँड' या नावाने ओळखले जाते. दोन मॉडेल एकमेकांना आडवी येऊ नयेत म्हणून कंपनी 'क्रेटा' या अतिशय लोकप्रिय ब्रँडच्या नावाचा फायदा घेऊन 7 सीटर सेगमेंटमधील आपली पकड आणखी मजबूत करू शकते.
नेक्स्ट जनरेशन क्रेटा 5 सीटर आणि 7 सीटर अशा दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये सादर होण्याची दाट शक्यता आहे. 7 सीटर मॉडेलचे डिझाईन बऱ्याच प्रमाणात रेग्युलर क्रेटासारखेच असेल. मात्र त्याला वेगळा लूक देण्यासाठी पुढच्या आणि मागच्या भागात (Front & Rear) खास बदल केले जातील.
ही नवी एसयूव्ही ह्युंदाई किया यांच्या आधुनिक 'K3' प्लॅटफॉर्मवर तयार होणार आहे. नेक्स्ट जनरेशन किया सेल्टोसही याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या प्लॅटफॉर्ममुळे गाडीचे स्ट्रक्चर मजबूत होईल. शिवाय व्हीलबेस (Wheelbase) आणि एकूण आकार वाढल्यामुळे केबिनमध्ये जास्त जागा (Space) मिळेल. रस्त्यावर टेस्टिंगदरम्यान दिसलेली ही गाडी पूर्वीपेक्षा जास्त बॉक्सी, रुंद आणि डॅशिंग दिसत आहे.
इंजिनच्या बाबतीत कंपनी सध्याचे लोकप्रिय पर्याय कायम ठेवू शकते. त्यात 1.5 लिटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (160 bhp पॉवर आणि 253 Nm टॉर्क) आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन (116 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क) यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
याशिवाय कंपनी या गाडीत स्ट्रॉन्ग-हायब्रिड (Strong-Hybrid) टेक्नोलॉजी देण्याचाही विचार करत आहे. हायब्रिड गाड्यांची मागणी वाढत असल्यामुळे क्रेटाच्या 7 सीटर व्हर्जनमध्ये हा हायब्रिड ऑप्शन मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
बाजारात आल्यानंतर 7 सीटर क्रेटाची थेट स्पर्धा महिंद्रा स्कॉर्पियो-एन, टाटा सफारी, एमजी हेक्टर आणि टॉमाहॉक यांसारख्या ताकदवान एसयूव्हीशी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.