हार्ले-डेव्हिडसनची स्वस्त क्रूझर Sprint 440 सादर, मेटिअर 350 शी स्पर्धा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
हार्ले-डेव्हिडसनने 2027 Sprint 440 ही आपली सर्वात नवी आणि स्वस्त क्रूझर बाईक सादर केली आहे. भारतातील तारीख आणि किंमत कंपनीने अजून सांगितलेली नाही.
हार्ले-डेव्हिडसनने आपली सर्वात नवी आणि स्वस्त क्रूझर बाईक सादर केली आहे. तिचं नाव 2027 Harley-Davidson Sprint 440. भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या रॉयल एनफिल्ड Meteor 350 ला आणि परदेशात लोकप्रिय असलेल्या होंडा रेबेल 300 ला थेट टक्कर देण्यासाठी ही बाईक आणली गेली आहे. ही बाईक Hero MotoCorp सोबत मिळून तयार केली आहे.
स्टायलिश, हलकी आणि सहज चालवता येणारी हार्ले हवी असणाऱ्यांसाठी ही बाईक आहे. डिझाईनमध्ये कंपनीने आपली जुनी क्रूझर स्टाईल चांगल्या पद्धतीने वापरली आहे. पुढच्या बाजूला क्लासिक गोल LED हेडलॅम्प आहे, त्यामुळे बाईकला जुन्या काळाचा फील येतो आणि तरीही ती नवीन वाटते. बॉब्ड रिअर फेंडर, फ्युएल टँक आणि खाली बसलेला स्टान्स यामुळे ती लांबूनही प्रीमियम हार्ले वाटते.
या बाईकची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तिची सीट हाईट. कंपनीने ती फक्त 671 mm ठेवली आहे. त्याचा थेट फायदा कमी उंचीच्या रायडर्सना होणार आहे. ज्यांनी पहिल्यांदाच मोठी क्रूझर बाईक चालवायला घेतली आहे, त्यांनाही ती सहज सांभाळता येईल. ट्रॅफिकमध्ये असो किंवा लांबच्या प्रवासात, बाईकवर आत्मविश्वासाने कंट्रोल ठेवता येईल.
आता इंजिनबद्दल. या बाईकमध्ये 440cc सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑईल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 27 hp ची पॉवर आणि 4,000 rpm वर 38 Nm टॉर्क देतं. त्याला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे. विशेष म्हणजे पाचवा आणि सहावा गिअर कंपनीने ओव्हरड्राइव्ह म्हणून ट्यून केला आहे. त्यामुळे हायवेवर 90 ते 100 किमी प्रतितास वेगाने जाताना इंजिनवर जास्त ताण जाणवणार नाही आणि रायडरला रिलॅक्स राईडिंगचा अनुभव मिळेल.
मायलेजबाबतही कंपनीने दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही बाईक 34 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते.
विक्रीबद्दल बोलायचं तर 2027 च्या सुरुवातीपासून जगभरातल्या वेगवेगळ्या बाजारांत ही बाईक विकायला सुरुवात होणार आहे. मात्र भारतात ती नेमकी कधी येणार आणि तिची किंमत काय असणार, याबद्दल कंपनीने अजून काहीच सांगितलेलं नाही.
हा 440cc प्लॅटफॉर्म Hero MotoCorp सोबत मिळून तयार केला असल्यामुळे ही बाईक भारतीय बाजारातही लवकरच येईल, असा अंदाज आहे. भारतात एंट्री-लेव्हल प्रीमियम क्रूझरमध्ये रॉयल एनफिल्ड Meteor 350 ची आधीच मजबूत पकड आहे. Sprint 440 भारतात आली, तर या सेगमेंटमधली स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.