ग्रेटर नोएडातील बिसरख गावात रावणाचे मंदिर, दसऱ्याला पुतळा जाळला जात नाही
उत्तर प्रदेशातील बिसरख गावातील लोक रावणाला आपला पूर्वज मानतात. दसऱ्याच्या दिवशी ते मंदिरात दर्शन घेतात आणि हवन-यज्ञात सामील होतात.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दसरा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा २० ऑक्टोबर रोजी देशभरात दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी देशभरात रावणाच्या पुतळ्याला जाळून सण साजरा केला जातो. वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा विजय हा या सणाचा मूळ उद्देश असतो. पण उत्तर प्रदेशातील एका गावाची परंपरा याहून वेगळी आहे. या गावात दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जात नाही, तर रावणाची पूजा केली जाते.
उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा येथे बिसरख नावाचे गाव आहे. या गावात रावणाचे मंदिर पाहायला मिळते. गावाचे नावही रावणाच्या वडिलांशी जोडले जाते. इथे आजही रावणाची पूजा केली जाते.
गावाच्या नावाचा इतिहास असा सांगितला जातो की, बिसरख हे नाव रावणाचे वडील ऋषी विश्वराव यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हे गाव मूळचे विश्वेश्वर म्हणून ओळखले जात होते. नंतर सोयीसाठी त्याचे नाव बदलून बिसरख असे करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुराणात विश्वेश्वर गावाचा उल्लेख आढळतो. विश्वराव ऋषींनी इथे शिवलिंगाची स्थापना केली, असे शिवपुराणात लिहिलेले आहे. रावण आणि त्याचे वडील हे दोघेही शंकराचे मोठे भक्त होते.
रावणाच्या या मंदिरात एक पुजारीही आहेत. ते दररोज मंदिराची साफसफाई करतात आणि रावणाच्या मूर्तीला पोशाख घालतात. रावणाच्या दर्शनासाठी लोक इथे येतात.
माहितीनुसार, बिसरख गावातील लोक रावणाला आपला पूर्वज मानतात. म्हणूनच इथे रावण दहन केले जात नाही. मंदिरात रावणाच्या अनेक प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आतल्या बाजूला प्राचीन अष्टभूमी शिवलिंग ठेवण्यात आले आहे, आणि त्यावर लोक पाणी अर्पण करतात.
दसऱ्याच्या दिवशी गावातील लोक रावणाच्या मंदिरात जातात, दर्शन घेतात आणि हवन-यज्ञात सामील होतात. बिसरख गावातील रावणाचे मंदिर आणि प्राचीन शिवलिंगाची ही परंपरा विशेष मानली जाते. म्हणजेच देशात इतरत्र दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन होत असताना, या गावात मात्र रावणाला पूर्वज मानून मंदिरात दर्शन घेतले जाते.