सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
06:55 IST

गोंदिया जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका सेवेचा २ लाख ९५ हजार ७ रुग्णांना लाभ

मार्च २०१४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील आकडेवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली. जिल्ह्यात सध्या १५ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका सेवेचा २ लाख ९५ हजार ७ रुग्णांना लाभ छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गोंदिया जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा आतापर्यंत २ लाख ९५ हजार ७ रुग्णांनी लाभ घेतला आहे. ही आकडेवारी मार्च २०१४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, या सेवेमुळे अपघातग्रस्त, गर्भवती महिला आणि इतर गंभीर रुग्णांना तातडीची मदत मिळाली.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १ मार्च २०१४ पासून ही सेवा सुरू करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ती चालते. सध्या जिल्ह्यात १५ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. ग्रामीण, शहरी आणि अतिदुर्गम भागांतील लोकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाते.

रस्ता अपघात, आग लागून भाजणे, हृदयविकाराचा झटका, विषबाधा आणि प्रसूतीशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत १०८ क्रमांकावर संपर्क साधता येतो, असे डॉ. पटले यांनी सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, रुग्णवाहिका अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असते आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रुग्णवाहिकेतच प्राथमिक उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. जीपीआरएस प्रणालीच्या मदतीने रुग्णवाहिकेचे स्थान निश्चित केले जाते.

जिल्ह्यातील या १५ रुग्णवाहिका सध्या के.टी.एस. सामान्य जिल्हा रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय आणि तिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे आहेत. याशिवाय देवरी, आमगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, नवेगाव बांध, गोरेगाव, सौंदड, चिचगड, सालेकसा आणि रजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयांत, तसेच एकोडी आणि डव्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतही रुग्णवाहिका कार्यरत आहेत, अशी माहिती डॉ. पटले यांनी दिली.

सकाळ आणि रात्र अशा दोन सत्रांत वाहनचालक व वैद्यकीय अधिकारी ही सेवा देतात. रुग्णाकडून किंवा इतर कोणाकडूनही १०८ क्रमांकावर कॉल आला की तो कुठून आला ते शोधले जाते. त्याच वेळी जीपीएसच्या मदतीने त्या भागात कोणते रुग्णालय आहे ते पाहून तिथल्या ग्रामीण रुग्णालयाला, उपजिल्हा रुग्णालयाला किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते. त्यानंतर रुग्णवाहिका कमीत कमी वेळात रुग्णापर्यंत पोहोचावी, याकडे लक्ष दिले जाते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जनजागृती वाढवून ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळात उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही डॉ. पटले यांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ