गोकुळमध्ये शासननियुक्त संचालकांना मतदानाचा हक्क; सतेज पाटलांचा ९ नोव्हेंबरला मोर्चा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यपालांनी अध्यादेशाला मंजुरी दिल्यानंतर सतेज पाटील यांनी कोल्हापुरात संघर्ष मोर्चाची घोषणा केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. गोकुळमध्ये चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. या अध्यादेशानुसार या संचालकांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे.
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. निकालानंतर महायुती सरकारने गोकुळमध्ये पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक जण सहाय्यक निबंधक दर्जाचा शासकीय अधिकारी असेल. उरलेल्या चार जणांना सहकारी संस्थांच्या कामकाजाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. चार तज्ज्ञ संचालकांना मतदान करता येईल, मात्र शासकीय अधिकाऱ्याला मतदान करता येणार नाही.
राज्यपालांच्या मंजुरीनंतर या पाच सदस्यांची नियुक्ती झाली आहे. त्यात शौमिका महाडिक, नाविद मुश्रीफ आणि अशोक फरकटे यांचा समावेश आहे. आणखी एक सदस्य आणि सहाय्यक निबंधक दर्जाचे अधिकारी असे मिळून पाच जण आहेत. नाविद मुश्रीफ हे या निवडणुकीत पराभूत झाले होते, तरीही त्यांचा या सदस्यांमध्ये समावेश झाला आहे.
या निर्णयामुळे २५ सदस्यीय संचालक मंडळात १३ जागा जिंकणाऱ्या सतेज पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे, चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने गोकुळमधील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. निवडणुकीत १२ जागा मिळवलेल्या महायुतीला या नियुक्त्यांमुळे संचालक मंडळात अतिरिक्त पाठबळ मिळू शकते आणि गोकुळच्या सत्तास्थापनेत सहभागी होण्याचा मार्गही खुला होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
अध्यादेशाला मंजुरी मिळाल्यानंतर सतेज पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून कोल्हापूरकरांना गोकुळमधील मनमानी कारभाराविरोधात आंदोलनाची हाक दिली. बंटी पाटील यांनी सवाल केला की, "तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता?"
सतेज पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, "चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं!" असा इशारा त्यांनी दिला.
कोल्हापूरकरांना साद घालताना सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबरला दसरा चौकात आंदोलनाची हाक दिली आहे. "आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता, दसरा चौक.." असे लिहून त्यांनी गोकुळमधील गैरकारभाराविरोधात जमण्याचे आवाहन केले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.