आठ दिवस रस्ता बंद ठेवूनही गडचांदूर-लखमापूर रेल्वे फाटकावरचा रस्ता एका दिवसात उखडला
रेल्वे फाटक क्रमांक ११ (LC No. 11/GDCR) येथील दुरुस्तीनंतर अवघ्या एका दिवसात रस्ता खराब झाल्याने रेल्वे विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराज आहेत.
गडचांदूर-लखमापूर रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटक क्रमांक ११ (LC No. 11/GDCR) येथे दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल आठ दिवस रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच रस्ता उखडल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे क्रॉसिंगवरील लेव्हलिंग आणि मेटलचे कामही अपूर्ण असल्याचे यातून दिसत आहे.
त्यामुळे दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
दुरुस्तीसाठी हा मुख्य रस्ता सलग आठ दिवस बंद होता. या काळात नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. काम झाल्यानंतर हा रस्ता टिकाऊ, मजबूत आणि सुरक्षित होईल, अशी सर्वसामान्य नागरिकांची प्रामाणिक अपेक्षा होती.
पण प्रत्यक्षात काम झाल्यानंतर एका दिवसातच रस्ता पूर्णपणे उखडला असून त्याचा पार बोजवारा उडाला आहे. गिट्टी आणि खडी सुटी झाल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका खूप वाढला आहे. आठ दिवस रस्ता बंद ठेवूनही तो एका दिवसात खराब होत असेल, तर कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते.
या रेल्वे फाटकाजवळच्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांची समस्या कायम आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आणि याच परिसरात अनेक अपघात झाले आहेत. म्हणून फाटक परिसरातील रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
अशा परिस्थितीत रेल्वे फाटकावरील रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी करून उपयोग होणार नाही. रस्ता वारंवार खराब होण्यामागचे कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
लखमापूर येथील सामाजिक कार्यकर्ते हरीशचंद्र थिपे म्हणाले, "आठ दिवस रस्ता बंद ठेवूनही दुरुस्तीचा दर्जा टिकत नसेल, तर या कामाचा उपयोग काय? दुरुस्तीच्या नावाखाली केवळ थातूरमातूर काम झाले का? दुरुस्तीच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी. अन्यथा रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करून रेल्वे बंद करू."
माणिकगड येथील रेल्वेमार्ग विभागाचे विभागीय अभियंता कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, गडचांदूर-लखमापूर रस्त्यावरील रेल्वे फाटक क्रमांक ११ (LC No. 11/GDCR) येथे दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल आठ दिवस रस्ता बंद ठेवून रेल्वे क्रॉसिंगवरील लेव्हलिंग आणि मेटलचे काम केले आहे. उर्वरित काम लवकरच करू.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.