मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:13 IST

गडचांदूरमध्ये उत्तरपत्रिका संकलन केंद्र हवे, यंग टीचर्स असोसिएशनची विद्यापीठाकडे मागणी

चंद्रपूरला उत्तरपत्रिका पोहोचवताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी गडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे संकलन केंद्र सुरू करावे, असे निवेदन देण्यात आले आहे.

गडचांदूरमध्ये उत्तरपत्रिका संकलन केंद्र हवे, यंग टीचर्स असोसिएशनची विद्यापीठाकडे मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राजुरा आणि कोरपना तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या गडचांदूर येथे विद्यापीठ परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे संकलन केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केली आहे. या मागणीसाठी संघटनेने विद्यापीठाकडे निवेदन दिले आहे.

हे निवेदन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन मुंगळे यांना देण्यात आले. असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी प्राचार्य प्रकाश शेंडे, संघटनेचे विभाग समन्वयक डॉ. शरद बेलोरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन राऊत, डॉ. विशाल मालेकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले.

गडचांदूर परिसरात एकूण पाच परीक्षा केंद्रे चालू आहेत. त्यात विदर्भ महाविद्यालय जिवती, राजीव गांधी महाविद्यालय पाटण, प्रभाकर मामुलकर महाविद्यालय कोरपना, शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर आणि महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूर यांचा समावेश आहे. आज या सगळ्या केंद्रांवरील उत्तरपत्रिका चंद्रपूर येथे जमा कराव्या लागतात.

मात्र चंद्रपूरचे संकलन केंद्र या महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांपासून बरेच लांब आहे, त्यामुळे गैरसोय होत आहे. म्हणूनच गडचांदूर येथे उत्तरपत्रिका संकलन केंद्र व्हावे, अशी मागणी या परिसरातील परीक्षा केंद्रांवर काम करणाऱ्या मुख्य परीक्षा प्रमुखांनीही केली आहे.

प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर वर सांगितलेली सगळी महाविद्यालये आणि चंद्रपूर यांच्यातील अंतर सुमारे ६० ते ९५ कि.मी. आहे. जिवती येथील परीक्षा केंद्रावर तीन महाविद्यालयांचे विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळे तिथल्या उत्तरपत्रिकांची संख्या मोठी असते.

जिवती ते चंद्रपूर हे अंतर सुमारे ९५ किमी आहे. रस्त्याची अवस्था दयनीय आहे आणि वेळेवर सार्वजनिक वाहतुकीची बस सेवाही मिळत नाही. त्यामुळे उत्तरपत्रिका मोटर सायकलवरून न्याव्या लागतात, आणि हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

पाटण, कोरपना आणि गडचांदूर येथील केंद्रांनाही अशाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही सगळी परिस्थिती आणि या समस्या लक्षात घेऊन गडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उत्तरपत्रिका संकलन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ