गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीला १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, सरनाईक यांची घोषणा

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीला १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, सरनाईक यांची घोषणा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान, सण उचल आणि महागाई भत्तावाढ जाहीर केली. इतर मागण्यांवर दिवाळीनंतर मार्ग काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी दिलासा देणारी घोषणा झाली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज हा निर्णय जाहीर केला. एसटीच्या ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

याशिवाय पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल दिली जाणार आहे. महागाई भत्ताही ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. गेले काही दिवस दिवाळी बोनसबाबत चर्चा सुरू होती, तिला या घोषणेमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

एसटी महामंडळातील वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणीतून जात असले, तरी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी या वेळी मांडली.

सरनाईक म्हणाले, "एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल आहे, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.

कर्मचाऱ्यांनी आंदोलन किंवा संप करू नये, असे आवाहनही सरनाईक यांनी केले. ते म्हणाले, "एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत."

कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतानाच प्रवाशांना चांगली सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध आहे, असे सरनाईक यांनी अधोरेखित केले.

बैठकीत बोनसशिवाय इतर आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांवरही चर्चा झाली. मात्र, या सर्व मागण्यांवर लगेच निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढला जाईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. त्यामुळे बोनसमुळे दिलासा मिळाला असला, तरी दिवाळीनंतर इतर मागण्यांबाबत काय निर्णय होतो, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दिवाळीपूर्वीच १० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सणाच्या खर्चासाठी त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ