गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

डोंबिवली एमआयडीसीत सर्व्हिस रोडवर कचरा पेटवला जातो; पेट्रोलियम पाइपलाइनमुळे धोक्याची भीती

डोंबिवली एमआयडीसीत सर्व्हिस रोडवर कचरा पेटवला जातो; पेट्रोलियम पाइपलाइनमुळे धोक्याची भीती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

डोंबिवली एमआयडीसीतील निवासी परिसरात सर्व्हिस रोडच्या कडेला अनधिकृतपणे कचरा टाकण्याचे आणि साचलेला कचरा पेटवून देण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यामुळे तिथल्या नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.

कचऱ्यात प्लास्टिक, थर्माकोल आणि रबर यांसारख्या वस्तू असतात. त्या जाळल्या की परिसरात धुराचे मोठे लोट पसरतात आणि प्रदूषण वाढते. या भागातून मुंबई-मनमाड उच्च दाबाची पेट्रोलियम पाइपलाइन आणि महानगर गॅसच्या वाहिन्या जातात. त्यामुळे कचऱ्याला लागलेली आग पुढे एखाद्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

निवासी परिसरातील काही नागरिक आणि व्यावसायिक केडीएमसीच्या घंटागाडीत कचरा न टाकता तो रस्त्याच्या कडेला फेकत असल्याचे दिसून आले आहे. काही ठरावीक ठिकाणी कचरा टाकण्याचे स्पॉटच तयार झाले आहेत. तिथे कचरा साचला की अज्ञात व्यक्ती त्याला आग लावतात, असे सांगितले जाते. आधीच औद्योगिक प्रदूषणाचा सामना करणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर या धुराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सर्व्हिस रोडवरील आरएम-२३ समोर, ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या हॉलजवळ, श्री गणराज बैंक्वेट हॉल, आयडीबीआय बँकेसमोर तसेच श्री रोहिडेश्वर दर्शन सोसायटी (आरएच-८५) ते डीएनएस बैंक, सोनारपाडा मुख्य कार्यालयापर्यंतच्या परिसरात कचरा टाकला जात आहे. या रस्त्यावर सतत वाहतूक सुरू असते. उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखालील मोकळ्या भूखंडांवर काही नागरिक आणि व्यावसायिक वाहनांतून कचरा आणून टाकतात, अशीही माहिती मिळाली आहे. काही जण रिक्षा आणि टेम्पोतून कचरा आणून तिथे फेकतात, असेही सांगितले जाते.

याच सर्व्हिस रोडवर उभारलेले वंदेमातरम् उद्यान आणि शैलगंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्प यांच्या परिसरात मात्र स्वच्छता राखली जाते, असे उदाहरण नागरिक देतात. पेट्रोलियम आणि गॅस पाइपलाइन, वीजवाहिन्या, सततची वाहतूक आणि जवळचा रहिवासी परिसर लक्षात घेता हा भाग संवेदनशील झाला आहे.

म्हणूनच कचरा टाकण्यास प्रतिबंध, नियमित स्वच्छता, सीसीटीव्हीद्वारे देखरेख आणि दोषींवर कारवाई अशा उपाययोजना प्रशासनाने तातडीने राबवाव्यात, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. केडीएमसीच्या स्वच्छता निरीक्षकांनी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर तसेच कचरा पेटवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही म्हटले जात आहे.

उच्च दाबाच्या परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले तर संबंधितांचा शोध घेणे शक्य होऊ शकते. तसेच एमआयडीसीने वीजवाहिन्यांखालील मोकळ्या भूखंडांवर नियमानुसार उद्याने विकसित करण्यासाठी आणि झाडे लावण्यासाठी विविध संस्थांना संधी दिली, तर कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा बसू शकतो.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ