सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:57 IST

दिवाळीआधी राज्यभर एफडीएचा फास: 68 आस्थापनांचे परवाने निलंबित, 20 जणांना अटक

दिवाळी आणि इतर सणांच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर 'फेस्टिव्ह क्रॅकडाउन' मोहीम सुरू केली असून 16.92 कोटींचा माल जप्त झाला आहे.

दिवाळीआधी राज्यभर एफडीएचा फास: 68 आस्थापनांचे परवाने निलंबित, 20 जणांना अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दिवाळी आणि इतर सण जवळ आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर 'फेस्टिव्ह क्रॅकडाउन' मोहीम सुरू केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई चालू आहे. भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन आढळले, तर संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित केले जात आहेत. या मोहिमेत एकूण 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवातही एफडीएने राज्यभर अशीच मोहीम राबवली होती. त्या काळात 9.11 कोटींचा निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त झाला. नियम मोडणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत 68 आस्थापनांचे परवाने निलंबित झाले आहेत. आणखी 7 ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. एकूण 22 गुन्हे दाखल झाले असून 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय मुदत संपलेला, खराब झालेला आणि नाकारलेला 8,392 किलो अन्नसाठाही जप्त झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये 4.19 कोटींचा अन्नसाठा पकडण्यात आला. राज्यात 3.15 कोटींचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूही जप्त करण्यात आला आहे.

आयुक्त मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहाही विभागांत ही मोहीम राबवण्यात आली. जे नष्ट करायला हवे असे अन्न पुन्हा बाजारात आणून ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचवतात, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नवरात्रोत्सवानंतर दिवाळीत मिठाई, खवा, खाद्यतेल, सुकामेवा आणि फराळाच्या पदार्थांची मागणी वाढणार आहे. म्हणूनच एफडीएतर्फे ही धडक मोहीम सुरू आहे.

माळशिरसमध्येही एफडीएने मोठी कारवाई केली. सोलापूर विभाग झोन-2 च्या पथकाने पुणे-पंढरपूर रोडवर खवा घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर छापा टाकला. त्यात 1337 किलो खवा सापडला आणि तो जप्त करण्यात आला. हा खवा लगेच खराब होणारा असल्याने तपासणीनंतर तो एका खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आला.

एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार, MH 25 AJ 4023 क्रमांकाचे हे वाहन धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या उत्पादकांनी बनवलेला खवा घेऊन निघाले होते. हा माल सातारा शहरातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना विकण्यासाठी आणि वितरणासाठी नेला जात होता. हा खवा उघड्यावर, कोणत्याही नियमाचे पालन न करता ठेवला जात होता. त्याची तपासणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ