दिल्लीतील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या ७७ टक्के विद्यार्थ्यांवर मध्यम ते उच्च ताण
नवी दिल्लीतील एका सरकारी मेडिकल कॉलेजच्या ४०६ विद्यार्थ्यांवरील अभ्यासात बहुतेकांना मध्यम किंवा उच्च ताण असल्याचे आढळले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मेडिकलला शिकणाऱ्या मुलांवर नेहमीच चांगली कामगिरी करण्याचे मोठे दडपण असते. नवी दिल्लीतील एका सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या एका नव्या अभ्यासात याबद्दलची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. या अभ्यासात तब्बल ७७ टक्के विद्यार्थ्यांमध्ये मध्यम ते उच्च स्वरूपाचा ताण आढळला.
हा अभ्यास 'इंडियन हार्ट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. दिल्लीतील त्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या चारही वर्षांचे मिळून एकूण ४०६ विद्यार्थी यात सहभागी होते. हे सगळे विद्यार्थी १८ ते २५ वर्षे वयोगटातले होते.
अभ्यासानुसार, ५४.४३ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला मध्यम ताण असल्याचे सांगितले. २२.६६ टक्के विद्यार्थी उच्च ताणाच्या स्थितीत होते. आणखी सुमारे २२.९ टक्के विद्यार्थ्यांमध्ये हलका ताण दिसला. म्हणजेच तीन चतुर्थांशांपेक्षा जास्त विद्यार्थी मध्यम किंवा उच्च ताणाखाली आहेत.
ताणाची कारणे काय, हेही अभ्यासात तपासले गेले. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची चिंता, कमी गुण मिळण्याची भीती आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता न येण्याची भीती ही प्रमुख कारणे असल्याचे यातून स्पष्ट झाले. अभ्यासात उत्तम कामगिरी करण्याचे सततचे दडपण विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा त्रास ठरत असल्याचे दिसले. शिवाय प्रचंड मोठा सिलॅबस वेळेत संपवण्याचे टेन्शनही त्यांना सतत अस्वस्थ करते. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीची योग्य दखल किंवा ओळख मिळत नाही, असेही वाटते.
वर्षानुसार पाहिले, तर एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च ताणाचे प्रमाण सर्वाधिक, म्हणजे ३०.११ टक्के नोंदले गेले. मात्र संशोधकांच्या मते वेगवेगळ्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीतील फरकामुळे असे दिसले असावे. त्यामुळे मेडिकलच्या पूर्ण शिक्षणात ताण वाढतच जातो, असा थेट निष्कर्ष यावरून काढता येत नाही. या अभ्यासात विद्यार्थ्यांचा ताण आणि 'हार्ट रेट व्हेरिएबिलिटी' (HRV) यांच्यातील संबंधही तपासण्यात आला.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. मोहित गुप्ता यांच्या मते, विद्यार्थी तणावात आहेत का, एवढेच विचारणे कधीच पुरेसे ठरत नाही. मेडिकल शिक्षणात ताणाचे पद्धतशीर मूल्यमापन करावे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या व ताण हाताळण्याच्या पद्धतींचा अभ्यासक्रमात समावेश करावा, हे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण अधिक सर्वसमावेशक, व्यावहारिक आणि संतुलित व्हावे, यावर डॉ. गुप्ता यांनी भर दिला. म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत मनोरंजनासाठी आणि इतर कलागुणांसाठी पुरेसा वाव मिळेल. विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिकदृष्ट्या मजबूत करणे पुरेसे नाही, तर त्यांना भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवणेही तितकेच गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे गरज पडली तर ते योग्य मदत घेऊ शकतील आणि ताणाचा नीट सामना करू शकतील.