तुंगभद्राचे २ टीएमसी फूट पाणी कर्जाऊ द्या, कर्नाटकातील भात उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्याणा येथील शेतकरी आणि तांदूळ गिरणी मालकांनी खरीप पीक वाचवण्यासाठी आंध्र प्रदेशच्या वाट्यातील २ टीएमसी फूट पाणी कर्ज म्हणून मागितले आहे.
महागाई सध्या चांगलीच वाढत आहे. वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सर्वसामान्यांचे जगणे कठीण होत चालले आहे. कांद्यापासून साखरेपर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. आता त्यात तांदळाची भर पडत आहे. कर्नाटकात पहिल्यांदाच तांदळाचा भाव किलोला १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. तिथले भातशेती करणारे शेतकरी तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करत आहेत.
राज्यातील प्रमुख तांदूळ उत्पादक भागांत पाण्याच्या कमतरतेमुळे ८० टक्क्यांपर्यंत पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून कर्नाटकातील कल्याणा येथील शेतकरी आणि तांदूळ गिरणी मालकांनी तुंगभद्रा विभागातील खरीप पीक वाचवण्यासाठी २० नोव्हेंबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत २ टीएमसी फूट पाणी कर्ज म्हणून द्यावे, अशी मागणी केली आहे. तुंगभद्रा जलाशयातून आंध्र प्रदेशला ४ टीएमसी फूट पाणी वाटप होणार आहे. त्यातले २ टीएमसी फूट पाणी कर्नाटकातील शेतकऱ्यांना द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
शनिवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बैठक होती. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने १५ डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा पक्का केला नाही, तर उभे असलेले ८० टक्के भात पीक नष्ट होऊ शकते. ६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भात पिकात प्रति एकर ४०,००० रुपये गुंतवले आहेत. त्यामुळे २,५०० कोटी रुपये पणाला लागले आहेत. कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष हनुमनागौडा दलगुर्की म्हणाले, "आंध्र प्रदेशला प्रस्तावित ४ टीएमसी पाण्यापैकी २ टीएमसी पाणी सरकारने सोडावे, अशी आमची मागणी आहे."
कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या कर्नाटकातील कल्याणा राज्यात दरवर्षी ७०-७५ लाख मेट्रिक टन तांदळाचे उत्पादन होते. त्यातले ६० टक्के उत्पादन तुंगभद्रा सिंचन क्षेत्रातून येते. या क्षेत्रात रायचूर, कोप्पल, विजयनगर आणि बल्लारी यांचा समावेश आहे. अलमट्टी जलाशयात पाणी मुबलक आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागांना कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही. मात्र तुंगभद्रा प्रदेशातील भातशेतीत ५० टक्क्यांनी घट झाली आहे.
कर्नाटक राज्य तांदूळ गिरणी संघटनेच्या अध्यक्षा सावित्री पुरुषोत्तम म्हणाल्या, "जर सरकारने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणीपुरवठा पक्का केला, तर बाजारात भाताचा पुरवठा होईल आणि भाव स्थिर होतील."
आता पाण्याचे कर्ज म्हणजे नेमके काय, तेही पाहू. आंध्र प्रदेशला कर्नाटकातील तुंगभद्रा जलाशयातून ४ टीएमसी फूट पाण्याचा आपला वाटा मिळणे नियोजित आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांचा प्रस्ताव असा आहे की, २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात खरीप पीक सुकून जाऊ नये म्हणून या ४ टीएमसी पाण्यापैकी २ टीएमसी फूट पाणी कर्नाटकातील भातशेतीला कर्ज म्हणून द्यावे. हे कर्ज असल्याने खरीप हंगाम संपल्यानंतर कर्नाटक आपल्या इतर प्रमुख जलाशयांमधून, जसे की अलमट्टी धरण किंवा कृष्णा खोऱ्यातील इतर स्रोत, २ TMC फूट पाणी सोडून त्याची परतफेड करेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.