लक्ष्मी रमण गोविंदाच्या जयघोषात देऊळगाव राजात लाटामंडप उत्सव उत्साहात संपन्न
प्रतितिरुपती म्हणून ओळख असलेल्या श्री बालाजी महाराजांचा आगळावेगळा लाटामंडपोत्सव देऊळगाव राजा शहरात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. अवघ्या महाराष्ट्रात हा उत्सव फक्त देऊळगाव राजा शहरातच पार पडतो. "बोल बालासाहेब की जय" आणि "लक्ष्मी रमण गोविंदा" अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मंदिरात घंटानाद झाला, प्रवेशद्वारावर नगारे वाजले आणि "गोविंदा गोविंदा"च्या गजराने श्री बालाजी मंदिर परिसर गजबजून गेला होता.
आश्विन शु. ८ सह ९, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. भाविक भक्तांच्या साक्षीने हा सोहळा रंगला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या उत्सवात मानकरी आणि भाविक भक्तांनी ४२ मंडपांना दोर बांधले. त्यानंतर दिड फूट व्यासाच्या आणि बत्तीस फूट उंचीच्या २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी त्यांनी केली.
महाद्वाराशेजारी हनुमानाची प्राचीन दगडी मूर्ती आहे, तर संस्थानसमोर गरुडाची दगडी मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींना हा अखंड दोर बांधून महाकाय लाटामंडप उभारण्यात आला. या कामासाठी मानकरी आणि सर्व समाजबांधवांचे सहकार्य मिळाले. लाटामंडप उभा राहिल्यानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने सर्व मानकऱ्यांना प्रसाद वाटण्यात आला.
श्री बालाजी संस्थानने पुढील कार्यक्रमांचे नियोजन जाहीर केले आहे. त्यानुसार आश्विन शु. ९ सह १०, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मध्यरात्री १२ वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. श्रींची पालखी आश्विन शु. १०, बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालून मंदिरात विराजमान होईल. त्यानंतर आश्विन कृ. ४, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५ वाजून ४५ मिनिटांनी लळित उत्सव संपन्न होणार आहे.
भाविक भक्तांना कानगी तसेच शाश्वत अन्नदान देणगी सहजपणे देता यावी, यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने स्वतंत्र क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांना या क्यूआर कोडचा वापर करून देणगी जमा करता येईल, अशी माहिती संस्थानने दिली आहे.
सर्व भाविकांनी श्रींच्या उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा, प्रसादाचा आणि यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव आणि व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.