परदेशी महिलांशी लग्न करण्याबाबत चीनमधील पोलिसांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा
पाकिस्तानसह इतर देशांतील महिलांशी विवाह करताना फसवणूक आणि कायदेशीर अडचणींचा धोका असल्याचे चीनमधील पोलिसांनी म्हटले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पाकिस्तानसह इतर कोणत्याही परदेशी देशांतील महिलांशी लग्न करण्याआधी सावध राहा, असा अधिकृत इशारा चीन सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे. चीनमधील प्रांतीय प्रशासन आणि पोलीस दलाने हा आदेश जारी केला असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार अशा विवाहांमध्ये भावनिक आधार नसतो, तर तो केवळ व्यावसायिक व्यवहार असतो. त्यामुळे चिनी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असून ते गंभीर कायदेशीर अडचणींत सापडत आहेत.
हा इशारा चीनमधील शिंटियान काउंटीच्या (Xintian County) स्थानिक पोलीस प्रशासनाने सार्वजनिक केला. पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अलीकडच्या काळात चिनी पुरुषांचे पाकिस्तान आणि इतर देशांतील महिलांशी विवाह होण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. मात्र अशा बहुतांश नात्यांचा पाया प्रेम नसून आर्थिक देवाणघेवाण असतो. त्यामुळे पुढे फसवणूक आणि कौटुंबिक तणाव निर्माण होतो आणि नागरिकांना कोर्ट-कचेऱ्यांचे खोटे गुन्हे सहन करावे लागत आहेत.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत अवैध पद्धतीने लग्न जुळवणाऱ्या एजंटांचे मोठे सिंडिकेट सध्या सक्रिय आहे. हे एजंट गरीब कुटुंबांतील मुलींना किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या चिनी पुरुषांना आकर्षित करून लाखो रुपयांची दलाली घेतात. जे नागरिक अशा मध्यस्थांच्या जाळ्यात अडकतात, त्यांचे आर्थिक नुकसान अटळ असते, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनेकदा लग्नानंतर काही दिवसांतच महिला गायब होतात किंवा पोलिसांत तक्रार दाखल करतात, त्यामुळे चिनी नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
चीन सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रांतीय स्तरावर अशा बेकायदेशीर विवाहांविरोधात आता कडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिंटियान काउंटीआधी हेनान (Henan) प्रांतातील पोलिसांनीही आपल्या रहिवाशांसाठी अशीच कडक सूचना जारी केली होती. चीनमध्ये व्यावसायिक किंवा फायद्यासाठी केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विवाहांवर कायद्याने पूर्णपणे बंदी आहे.
पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनेत तीन गोष्टी नमूद केल्या आहेत. पहिली म्हणजे फसवणुकीचा गुन्हा: पोलीस तपासात एखादा विवाह केवळ आर्थिक फायद्यासाठी किंवा दलालामार्फत अवैध पद्धतीने केल्याचे आढळले, तर संबंधित व्यक्तींवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला जाईल.
दुसरी गोष्ट इमिग्रेशन कायद्याच्या उल्लंघनाची आहे. परदेशी महिला किंवा मुलगी बेकायदेशीर व्हिसा अथवा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे चीनमध्ये आली, तर इमिग्रेशन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. तिसरी गोष्ट ताबा आणि हकालपट्टीची: नियमबाह्य पद्धतीने झालेल्या विवाहानंतर संबंधित महिला अथवा पुरुषाला पोलीस कोठडीत घेतले जाऊ शकते आणि त्यांना मायदेशी परत पाठवले (Deportation) जाऊ शकते.
चीनच्या अधिकृत सांख्यिकी विभागाच्या जुन्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये सुमारे १२० पाकिस्तानी मुलींनी चिनी पुरुषांशी विवाह केला होता. २०२० पर्यंत हा आकडा ६०० च्या पुढे गेला. या अचानक झालेल्या वाढीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी आणि सक्तीच्या विवाहाच्या तक्रारी वाढू लागल्या. त्यामुळे चीन सरकारने या विवाहांबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर करणे पूर्णपणे बंद केले.
याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानात एका चिनी नागरिकाला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. एका तरुण पाकिस्तानी मुलीला फसवून चीनमध्ये नेण्याचा आणि तिच्याशी बळजबरीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर होता. या घटनांमुळे दोन्ही देशांतील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. चीनने आपल्या नागरिकांना खऱ्या प्रेमाच्या आधारे आणि कायदेशीर इमिग्रेशन नियमांचे पालन करूनच विवाह करण्याचे आवाहन केले आहे.