चिमूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शिवानी वडेट्टीवारांच्या ठिय्यानंतर गुन्हा; आरोपी फरारच
गुन्हा दाखल करून घेतला जात नाही, असा आरोप करत शिवानी वडेट्टीवार यांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. त्यानंतर BNS आणि POCSO खाली गुन्हा नोंदवला गेला, पण आरोपी अजून सापडलेला नाही.
चिमूरमधील एका अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराचे प्रकरण आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर चांगलेच गाजू लागले आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप असूनही गुन्हा दाखल होत नाही, असा दावा करत महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपी मात्र अजूनही फरार असल्याचे सांगितले जात आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि पीडित कुटुंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही गंभीर गोष्ट समोर आल्यावर शिवानी वडेट्टीवार यांनी आपले ठरलेले सगळे कार्यक्रम बाजूला ठेवले आणि थेट चिमूर पोलीस स्टेशन गाठले. गुन्हा नोंदवायला पोलीस टाळाटाळ करत आहेत, असे सांगत त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. शेवटी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४ (A) अन्वये, तसेच बाल लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) खाली गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात भाजपचा चिमूर मंडळ अध्यक्ष आणि मौजा सातारा येथील आदर्श ग्रामपंचायतीचा माजी सरपंच गजानन धनराज गुडधे याच्यावर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गंभीर आरोप आहे. एकीकडे महिला आणि मुलींना 'लाडकी बहीण' म्हणणारा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष महिलांच्या सुरक्षेबाबत प्रत्यक्षात किती गंभीर आहे, हे चिमूरच्या घटनेवरून दिसते, असे यात म्हटले आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिच्या घरच्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर ती अतिशय चिंतेची गोष्ट आहे.
अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यासाठीसुद्धा ठिय्या आंदोलन करावे लागते, यावरून पोलीस प्रशासनाच्या कामाच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अजून फरार आहे. त्याला तातडीने अटक व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळावा आणि तिच्या कुटुंबावर कोणताही दबाव किंवा धमकी येऊ नये, अशी मागणी शिवानी वडेट्टीवार यांनी केली.
पुढे अल्पवयीन मुली आणि महिलांवर अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस प्रशासनाला तसेच आमदार बंटी भांगडीया यांना देण्यात आले.
शिवानी वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपीला अटक होऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. सत्तेचा किंवा राजकीय पदाचा वापर करून कोणालाही कायद्यापासून संरक्षण मिळता कामा नये, असेही त्या म्हणाल्या.
या वेळी विजू पाटील गावंडे, गजानन बुटके, जुनेद खान, प्रशांत डवले, माधवबापू बिरजे, शांताराम सेलवटकर, संदीप कावरे, रत्नाकर विटाळे, बब्बू खान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.