चिमूर बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य, चालकांची कसरत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एसटी महामंडळाच्या चिमूर बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रवासी आणि बसेस, दोघांचीही गैरसोय होत आहे. डांबरीकरणासाठी विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे प्रभारी आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या चिमूर बसस्थानकाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. स्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी आणि एसटी बसेस, अशा दोघांचीही मोठी गैरसोय होत आहे.
स्थानकात येताना तसेच बाहेर पडताना चालकांना खड्ड्यांचा अंदाज घेत घेत बस चालवावी लागते. खड्ड्यांमुळे बसला जोरदार धक्के बसतात आणि गाडीचे नुकसान होण्याची शक्यताही वाढली आहे. या धक्क्यांचा थेट त्रास बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
विशेषतः वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, शाळकरी विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी स्थानकातला हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. बसमध्ये चढताना आणि उतरतानाही प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचले की त्यांची खोली लक्षात येत नाही, त्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण होतो.
एकीकडे महामंडळाकडून लालपरी आणि राजमाता जिजाऊ यांसारख्या नव्या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जात आहेत. दुसरीकडे याच बसेसना चिमूर बसस्थानकातील खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. नव्या गाड्या आणि मोडकळीस आलेली स्थानकाची व्यवस्था, असे विरोधाभासी चित्र त्यामुळे दिसून येत आहे.
चिमूर हे तालुक्याचे महत्त्वाचे केंद्र असल्याने ग्रामीण भागातील नागरिक शिक्षण, उपचार, नोकरी आणि इतर कामांसाठी दररोज या बसस्थानकात येतात. प्रवाशांची इतकी मोठी वर्दळ असतानाही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.
प्रवाशांची गैरसोय आणि बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, एसटी बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. नव्या बसेस आणि आधुनिक प्रवासाच्या घोषणा केल्या जात असताना खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त कधी मिळणार, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असेही ते विचारत आहेत.
याबाबत चिमूरचे प्रभारी आगार व्यवस्थापक इमरान शेख यांनी सांगितले की, चिमूर बसस्थानकाच्या डांबरीकरणासाठी विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.