बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

चिमूरमध्ये चौघांचा जीव घेणारा 'त्रिशूल' वाघ पकडला, ब्रह्मपुरीत ठेवले

चिमूरमध्ये चौघांचा जीव घेणारा 'त्रिशूल' वाघ पकडला, ब्रह्मपुरीत ठेवले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

चिमूर तालुक्यात दीड वर्षापासून दहशत माजवणारा सुमारे पाच वर्षांचा नर वाघ 'त्रिशूल' ३ नोव्हेंबरच्या रात्री वनविभागाच्या पथकाने डार्ट मारून पकडला.

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता सुटकेचा श्वास सोडला आहे. गेल्या दीड वर्षापासून या भागात दहशत माजवणारा 'त्रिशूल' नावाचा वाघ वनविभागाच्या विशेष पथकाने पकडला आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ च्या रात्री ही मोहीम पार पडली. हा नर वाघ सुमारे पाच वर्षांचा आहे. चार जणांच्या मृत्यूशी त्याचा संबंध असल्याचे वनविभागाने सांगितले.

चिमूर प्रादेशिक वन परिक्षेत्रात येणाऱ्या गदगांव बीटमधील उरकुडपार येथे संरक्षित वन कक्ष क्रमांक ३८० आहे. याच कक्षात वाघाला डार्ट मारण्यात आला. सध्या त्याला ब्रह्मपुरी येथील टीटीसी सेंटरमध्ये ठेवले असून, तिथे त्याच्यावर विशेष देखरेख सुरू आहे. पुढील उपचारही तिथेच होणार आहेत.

या वाघाने गेल्या दीड वर्षात चार जणांचा जीव घेतला होता. २३ एप्रिल २०२६ रोजी वाहनगांव येथील शंकर मसराम यांना त्याने भक्ष्य केले. ६ जुलै रोजी नवेगांव पुनर्वसन येथील राजेंद्र भोयर यांचा खडसंगी बफर क्षेत्रात त्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वी, ३० ऑक्टोबर रोजी गरडापार येथील ५० वर्षीय शेतकरी सदाशिव चिरकुटा यांच्यावर त्याच वन कक्षात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला आणि ते जागीच ठार झाले.

या घटनेनंतर चिमूर परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण होते. शेतात सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत होते. वाघाला तातडीने पकडावे, अशी मागणी जोर धरत होती.

लोकांचा रोष आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस.आर. आणि सहायक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त मोहीम आखण्यात आली. त्यात चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देवरकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आरआरटी (RRT) टीम आणि स्थानिक पोलीस प्रशासन सहभागी होते. ३ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास गदगांव परिसरातील कक्ष क्रमांक ३८० मध्ये वाघ नेमका कुठे आहे, हे पथकाला कळले.

ताडोबाचे वन्यजीव वैद्यकीय अधिकारी आणि रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रमुख डॉ. रविकांत एस. खोब्रागडे आणि आरआरटीचे शूटर अजय सी. मराठे यांनी धाडसाने ही कामगिरी केली. त्यांनी रात्री ११:४० वाजता वाघाला डार्ट (ट्रॅन्क्विलायझर) मारून बेहोश केले. त्यानंतर काही मिनिटांतच, रात्री १२:१० वाजता, वाघाला सुरक्षितपणे स्ट्रेचरवर घेण्यात आले. १२:२५ वाजता त्याला रिव्हर्सल डोस दिला गेला आणि १२:२७ वाजता वाघ पूर्णपणे हालचाल करू लागला.

मोहिमेत डॉ. खोब्रागडे, शूटर अजय सी. मराठे (RRT TATR) आणि ब्रह्मपुरीचे जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांच्यासह योगेश लकडे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल वाटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे या वन व रेस्क्यू पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या संयुक्त कारवाईमुळे चिमूर परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ