शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

चिमूर आणि सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी ठार, सहा दिवसांत चौघांचा बळी

चिमूर आणि सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी ठार, सहा दिवसांत चौघांचा बळी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभागात उरकुडपार आणि धूमनखेडा येथे दोन शेतकऱ्यांचा वाघाने जीव घेतला. गेल्या सहा दिवसांत या भागात वाघाच्या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या चिमूर आणि सिंदेवाही वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. शेतात कामासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा दोन वेगवेगळ्या घटनांत वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. गेल्या सहा दिवसांत या भागात वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा जीव गेला आहे, ही यातली विशेष बाब आहे.

पहिली घटना चिमूर तालुक्यातील उरकुडपार गावात घडली. गावातील 55 वर्षांचे सदाशिव खडसंग आपल्या शेताला लागून असलेल्या जंगलात झुडपे तोडायला गेले होते. त्या वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात ते जागीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि सहायक पोलीस निरीक्षक खोब्रागडे घटनास्थळी पोहोचले. आवश्यक पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठवण्यात आला.

दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरात असलेल्या धूमनखेडा गावात घडली. तिथले 58 वर्षांचे पत्रु रामजी मेश्राम शेतात काम करायला गेले होते. दुपारी साधारण 4:30 वाजता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

संध्याकाळ झाली तरी ते घरी परतले नाहीत, म्हणून कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेताना ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच क्षेत्र सहायक सिडाम आणि वन विभागाचे वनरक्षक घटनास्थळी आले. पंचनामा झाल्यावर मृतदेह ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे नेण्यात आला.

याआधी 24 ऑक्टोबरला सिंदेवाही वन परिक्षेत्रातील पळसगाव येथे नानाजी कांबळी यांचा, तर 25 ऑक्टोबरला भेंडाळा (खातगाव) येथे प्रेमिला महाडोरे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आता उरकुडपार आणि धूमनखेडा येथील घटनांनंतर सहा दिवसांत वाघाच्या हल्ल्यात चौघांचा जीव गेला आहे.

वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या सर्व घटनांमागे एकच वाघ असू शकतो. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळायचा आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तो कुठे आहे हे शोधण्यासाठी वन विभागाचे सुमारे 50 ते 60 कर्मचारी कॅमेरा ट्रॅप लावून शोधमोहीम राबवत आहेत.

सततच्या हल्ल्यांमुळे गावकरी घाबरलेले आहेत. दुसरीकडे शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जावे लागतेच. अशा परिस्थितीत गावकऱ्यांची सुरक्षा हे वन विभागासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांनी सांगितले की वाघ सतत आपली जागा बदलत आहे. वाघाला ट्रँक्विलाइज करण्याची म्हणजे बेशुद्ध करून पकडण्याची कारवाई होईपर्यंत शेतात आणि जंगलाला लागून असलेल्या भागात जाताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

#नागपूर#शहर#PT24#Civic#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ