सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:21 IST

चेकपिपरीत जगन्नाथ महाराज देवस्थानाच्या २१ व्या वर्षानिमित्त भक्तीचा सोहळा

गोंडपिपरीपासून चार किलोमीटरवरील चेकपिपरी गावात १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी भजन, प्रवचन आणि संगीताचे कार्यक्रम झाले. हजारो भाविक सहभागी झाले.

गोंडपिपरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकपिपरी गावात १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी भजन, धार्मिक प्रवचन आणि संगीताच्या कार्यक्रमांनी सगळे गाव भक्तीमय झाले. जगन्नाथ महाराज देवस्थानाच्या स्थापनेला यंदा २१ वर्षे झाली. त्यानिमित्त चेकपिपरी येथे हे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष उल्हास करपे यांनी सुमारे एकवीस वर्षांपूर्वी हे देवस्थान उभारले. अध्यात्मातून प्रबोधन करण्याचा ध्यास घेऊन त्यांनी चेकपिपरी येथे जगन्नाथ महाराज देवस्थानाची मुहूर्तमेढ रोवली. आज हा परिसर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनला आहे. या देवस्थानाच्या माध्यमातून धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

कार्यक्रमाची सुरुवात १५ तारखेला श्री मारोती महाराज हळस्ती यांच्या हस्ते घटस्थापनेने झाली. त्यानंतर १६ ऑक्टोबरला सकाळी चेकपिपरी गावातून पालखी पदयात्रा काढण्यात आली. त्यात अनेकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. पंचकुंडी गायत्री यज्ञही करण्यात आला. दुपारी ह.भ.प. सुवर्णाताई पिंपळकर यांचे भव्य कीर्तन झाले.

सायंकाळी महाप्रसाद आणि घुगरीकाला यांचे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच भक्तीरसाचा कार्यक्रमही झाला. महाराष्ट्राचे ख्यातनाम तबलावादक डॉ. देवेंद्र यादव, महाराष्ट्राचे भजनसम्राट पंडित रंकनाथ वैरागकर यांचे शिष्य अविनाश कन्नाके आणि ह.भ.प. सुवर्णाताई पिंपळकर यांनी भक्तीरसातून भक्तांना भक्तीची साद घातली. उपस्थित भाविक भारावून गेले आणि भक्तीत तल्लीन झाले.

या संपूर्ण कार्यक्रमात संत सोनामाता यांनी काला आरतीच्या माध्यमातून लोकांना भक्तीचा संदेश दिला. दरम्यान हनुमान वासेकर, झाडे मॅडम आणि कुंभारे मॅडम यांनी भजनाचा कार्यक्रम घेतला. रात्री साई म्युझिकल आर्केस्ट्राच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला राजुरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार संजय धोटे, पांडुरंग जाधव, जयंत टेम्भूर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक उल्हास करपे यांच्यासोबत संदीप करपे, किशोर अगस्ती, श्रीकांत मलोझलवार, ईशान करपे, रिना करपे, इरा करपे यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती. या वेळी विविध उपक्रमही घेण्यात आले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ