सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:54 IST

देऊळगाव राजात सीमोल्लंघनासाठी गुगुळा माता मंदिरात जाण्याचे आवाहन

श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव जवळ आला असून जुनी सीमोल्लंघनाची परंपरा टिकवण्यासाठी गिरोली बुद्रुक येथील गुगुळा माता मंदिरात जाण्याचे आवाहन केले जात आहे.

देऊळगाव राजात सीमोल्लंघनासाठी गुगुळा माता मंदिरात जाण्याचे आवाहन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे जवळ आला आहे. गेल्या चारशे वर्षांचा आढावा घेतला तर यात बरेच बदल झाल्याचे दिसते. मंडपोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी दसरा उत्सव असतो. पांडवांचा वनवास संपला, तेव्हा त्यांनी आपली शस्त्रे आपटा आणि शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी ती शस्त्रे झाडावरून परत आणली. त्याप्रमाणे देऊळगाव राजा नगरात श्री बालाजींची पालखी रात्री श्रवण नक्षत्रात सीमोल्लंघनासाठी निघते. आमना नदीच्या मार्गाने गावाला प्रदक्षिणा पूर्ण करून ती दुसऱ्या दिवशी मंदिरात परत येते. त्या दिवशी गावातील सर्व लोकांना मूळ बालाजींच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेण्याची मुभा असते.

पूर्वी संध्याकाळी गावातील असंख्य तरुण मुले टोळीटोळीने दक्षिण दिशेला जात असत. पन्नास वर्षांपूर्वी आमना नदीच्या पलीकडे जुनी स्मशानभूमी होती आणि त्याच्याही पलीकडे लंकेचा बाग व काळुंका माता. तिथे दर्शन घेऊन आपटा व शमीच्या झाडाखाली पूजा केली जाई. आपटा व शमीची पाने सोने-चांदी समजून प्रसाद म्हणून घरी आणली जात. झाडाखाली जोशी ब्राह्मण बसलेले असायचे आणि ते तोडून ठेवलेली पाने देत असत. नवीन कपडे घालून, डोक्याला टोपी आणि कपाळाला लाल टिळा लावून मंडळी मोठ्याने "बोल बालाजी महाराज की जय लक्ष्मी रमण गोविंदा" अशी गर्जना करत हे सीमोल्लंघन करत.

नंतर आमना नदीला पाणीच राहिले नाही. त्याआधीच्या काळात रात्री बालाजींची पालखी नदीत बुडवली जायची. पुलाखाली खूप पाणी असायचे, तिथे बराच वेळ खेळून पालखी ओट्यावर ठेवली जाई. त्या वेळी श्री तिरुपती बालाजी आणि वाशिमचा बालाजी एकत्र येतात, अशी सर्वांची श्रद्धा होती. तिन्ही बालाजींच्या दर्शनाचा लाभ होतो म्हणून खूप थंडी असतानाही अनेक स्त्री-पुरुष येत. त्या काळात नदीत वाळू होती आणि पात्र मोकळे होते. तिथे कुस्त्यांचे आखाडे भरत आणि मोठ्या प्रमाणात बारूद फोडला जाई. हा दसरा उत्सव पाहण्यासाठी किनगाव राजा, सिंदखेडराजा, वाघरूळ जहागीर, लिमखेड, सावखेड तेजन आणि पंचक्रोशीतील अनेक लोक बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने येत असत.

नदीपात्राच्या वरच्या भागात सावखेड भोई येथे धरण झाले आणि नदीचे स्वरूप बदलले. आता नदीकाठावर जोशी ब्राह्मणांकडून पूजा करून घेतलेली आपट्याची पाने लोक सायंकाळी आणतात, पण त्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सीमोल्लंघनाची ही परंपरा सुरू ठेवणे खूप गरजेचे आहे, असे सर्वजण मानतात. आपटा व शमी घेऊन आल्यानंतर सगळे बालाजी मंदिरात तेच सोने वाहून दर्शन घेतात आणि देवाला पेढे, बर्फी वाटतात. घरी गेल्यावर सुवासिनी सर्वांना ओवाळतात, घरातील देवालाही हे सोने वाहिले जाते. एकमेकांकडे जाऊन आशीर्वाद घेतले जातात आणि मोठ्यांना नमस्कार करून सीमोल्लंघनाचा खरा आनंद मिळतो.

तो पूर्वीचा आनंद परत मिळावा म्हणून काळुंका मातेऐवजी आता गुगुळा देवी मंदिराकडे जाण्याचे सुचवले जात आहे. गावाची सीमा वाढली, गाड्यांची सोय झाली आणि रस्ते तयार झाले. पिंपळनेर मारुती दर्शनासोबतच जवळच गिरोली बुद्रुक रस्त्यावर असलेल्या गुगुळा देवी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. गिरोली येथील रहिवासी आणि देऊळगावचे प्राध्यापक स्वर्गीय वसंतराव मुळे हे पिंपळनेर व देवीच्या दर्शनाला रोज जात. त्यांनी नियोजित ट्रस्ट स्थापन केला, आराखडा तयार केला आणि दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर गेवराई येथून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक प्रदीप मीनासे यांनी 2012 पासून श्री गुगुळा देवी संस्थान ट्रस्ट, गिरोली बुद्रुकच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

गुगुळा माता अनेकांची कुलदेवता आहे. चैत्र महिन्यात दरवर्षी पौर्णिमेला, हनुमान जयंतीला, तिथे मोठी यात्रा भरते. तीनशे वर्षांपूर्वी विटा व चुन्यात बांधलेल्या दोन दीपमाळा आणि तितकीच जुनी, विटा-चुन्यात बांधलेली धार्मिक शाळा आजही उत्तम स्थितीत आहेत. देवीच्या पायथ्याशी मारुतीची दगडी मूर्ती आहे. मंदिरावर अजून छत नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जसे सूर्य महालक्ष्मीचे मुखदर्शन घेतो, तसेच इथेही फेब्रुवारी महिन्यात देवीचे सूर्य मुखदर्शन होते. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी बरेच लोक येतात.

शेगावच्या धर्तीवर विश्वस्त मंडळी निष्पृह वृत्तीने तन-मन-धनाने विकास करत आहेत. श्रीकृष्ण गोवर्धन ट्रस्ट गोशाळा या नावाने 2017 मध्ये गोरक्षण गोशाळा सुरू झाली, जिथे आज 100 पेक्षा जास्त गायींचा सांभाळ केला जातो. गावातील काही दानशूर मंडळी दरमहा हजारो रुपये देऊन गायींच्या चाऱ्याचा खर्च भागवतात. बालोद्यान, ध्यानमंदिर, विद्या तीर्थ, अखंड नंदादीप महोत्सव, बारा गाड्या ओढण्याचा नवस, नवरात्रीतील होमवन, पाच रंगांची कमल फुले, अन्नदान, टेकडीवरील गुफा मंदिर आणि नव्याने बांधलेले मंगल कार्यालय हेही तिथे आहे. पाण्यातील गेम आणि टायरपासून बनवलेले खेळाचे प्रकार प्रेक्षकांचे मन आकर्षित करतात. वनसंपदाही मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेते.

तिथे शमीची 3 झाडे आणि एक गावरान आपट्याचे झाड असल्यामुळे दरवर्षी सीमोल्लंघनाला प्रत्येक कुटुंबातील लहान मुला-मुलींना घेऊन जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण उपलब्ध झाले आहे. जुनी परंपरा पुन्हा सुरू व्हावी, या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गुगुळा माता म्हणजे पूर्वीचे नाव महालक्ष्मी विद्यादेवी. परमपूज्य श्री वक्रतुंड महाराज कवीश्वर यांनी शतकापूर्वी, 120 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ब्रह्मांड पुराणाच्या मानसोत्तर खंडात, देवालय ग्राम महात्म्य या संस्कृत ग्रंथातील कथानकात तिचे सविस्तर वर्णन आहे. अशा समृद्ध परिसरात सीमोल्लंघनाच्या दिवशी सहकुटुंब जाऊन अखंड लक्ष्मी आणि विद्यावंत होण्यासाठी आशीर्वाद घ्यावेत, असे सांगितले आहे. जय जगदंबा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ