शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

मतदार यादीत नाव नसलेल्यांना अंतिम यादीसाठी पुन्हा संधी, आयोगाचा निर्णय

मतदार यादीत नाव नसलेल्यांना अंतिम यादीसाठी पुन्हा संधी, आयोगाचा निर्णय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

विशेष सखोल पुनरीक्षणात प्रारूप यादीत नाव येऊ न शकलेल्या पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगाने अंतिम यादीसाठी पुन्हा संधी दिली आहे. त्यासाठी गणना प्रपत्र भरावे लागेल.

चंद्रपूर : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) सुरू असताना काही पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत येऊ शकली नाहीत. त्यांची नोंद अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार अशी झाली होती. अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी दिली आहे. संबंधित मतदारांनी आवश्यक गणना प्रपत्र आणि निवेदन सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

आयोगाच्या 6 नोव्हेंबर 2026 रोजीच्या निर्देशानुसार, ज्या मतदारांना गणना प्रपत्र देण्यात आले होते, पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची नावे प्रारूप यादीत आली नाहीत, त्यांची मतदान केंद्रनिहाय यादी पुन्हा प्रसिद्ध होणार आहे. ही यादी संबंधित मतदान केंद्रांच्या सूचना फलकांवर, ग्रामपंचायत कार्यालयांत, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत पाहता येईल. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही ती प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप यादीत नाव नसलेल्या मतदारांनी भरलेले आणि स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे द्यावे.

जे मतदार पूर्वीच्याच पत्त्यावर राहतात, त्यांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-B मधील निवेदन द्यावे. यापूर्वी गणना प्रपत्र का सादर केले नाही, याचे कारण त्या निवेदनात लिहिणे आवश्यक आहे.

राज्यातच स्थलांतर केलेल्या मतदारांनी नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाचा तपशील लिहावा. त्यांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-C मधील निवेदन आणि नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा. अशा मतदारांना वेगळा नमुना क्रमांक 8 (Form-8) भरण्याची गरज नाही.

मतदारांना त्यांच्या पूर्वीच्या मतदार छायाचित्र ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक वापरून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा ECINET ॲपवरून गणना प्रपत्र डाउनलोड करून सादर करता येईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी 'Book a Call with BLO' ही सुविधाही उपलब्ध आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान नवीन मतदार नोंदणीसाठी ज्यांनी आधीच नमुना क्रमांक 6 (Form-6) भरला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र द्यावे लागणार नाही.

संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अशा मतदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करतील आणि गणना प्रपत्र उपलब्ध करून देतील. मिळालेल्या अर्जांची नियमानुसार तपासणी आणि पडताळणी झाल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली जातील.

कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, म्हणून प्रारूप यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून घ्यावे, असे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. नाव नसेल तर आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र विहित पद्धतीने सादर करावे. जिल्ह्यातील सर्व संबंधित पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ