शरद पवार सिल्व्हर ओकवर परतले, आव्हाड, देशमुख, शिंदे आणि पार्थ पवार भेटीला; विलीनीकरणाची चर्चा पुन्हा रंगली
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. तिथे शरद पवार गटातील नेत्यांसोबत अजित पवार गटातील पार्थ पवार यांनीही भेट घेतल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. घरी परतताच त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील मोठ्या नेत्यांसोबतच अजित पवार गटातील पार्थ पवारही भेटीसाठी आल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार सिल्व्हर ओकवर पोहोचल्यानंतर शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांनी लगेच तिकडे धाव घेतली. यात आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आधीपासूनच चर्चेत असल्याने या भेटींकडे राजकीय वर्तुळात वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे नेते पार्थ पवारही सिल्व्हर ओकवर गेले आणि त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. पार्थ पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. मात्र या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विलीनीकरणाच्या चर्चेला याआधीच सुरुवात झाली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयावर भाष्य केल्यानंतर चर्चेला आणखी जोर आला. तटकरे यांनी असे विधान केले होते की, अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले असते. हे विधान तटकरे यांनी केलेले आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीत 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचा उल्लेख झाल्याने विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली, असे सांगितले जात आहे. पटेल यांच्या भेटीमुळेही याबाबत बोलले जात होते.
आता दोन्ही राष्ट्रवादीतील मोठे नेते सिल्व्हर ओकवर, म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी, जाऊन त्यांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा काही मोठे घडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दिशेने काही हालचाली सुरू आहेत का, याचे उत्तर आगामी घडामोडींमधूनच स्पष्ट होईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.