चंद्रपुरात रिक्षा चोरी, रामनगर पोलिसांनी चोराला पकडले
चंद्रपुरातील रामनगर पोलिसांनी चोरीला गेलेली ८० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त केली असून, ती पळवणाऱ्या चोरट्याला पकडले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी रिक्षा चोरीच्या एका गुन्ह्याचा छडा लावला आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन चाकी रिक्षा पळवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली ८० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रामनगर पोलिसांना एका गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. तक्रारदार अनिले महादेव गुडे (वय ४५, रा. आंबेडकर नगर, बाबूपेठ, चंद्रपूर) यांनी आपल्या मालकीची रिक्षा (एम.एच. ३४ डी. ६९६३) जिल्हा परिषदेजवळच्या पेट्रोल पंपासमोर उभी केली होती. त्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने संधी साधून ती रिक्षा पळवली. गुडे यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार रामनगर पोलिसांचे शोध पथक या चोरीचा समांतर तपास करत असतानाच पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. चोरीला गेलेली ती रिक्षा पालीवाल हॉस्पिटल, महाकाली मंदिर रोड परिसरात एका संशयिताकडे असल्याचे त्या माहितीत सांगण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली, संशयिताचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे नाव शेख गफार रज्जाक शेख (वय ३५, रा. दुर्गानगर, ता.जि. चंद्रपूर) असे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरलेली ८० हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त केली.
या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने पोलीस कसून चौकशी करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे यांच्यासह शोध पथकातील पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके आणि ब्ल्युटी साखरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.